Thu, Jul 18, 2019 12:16होमपेज › Pune › देहूत भरला वैष्णवांचा मेळा

देहूत भरला वैष्णवांचा मेळा

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 03 2018 11:57PMदेहूरोड : वार्ताहर

तुकाराम बीज उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातुन वारकरी, भाविक देहूत दाखल झाले होते. गेले दोन दिवस भाविकांचा ओघ अखंडपणे सुरू होता. पायी दिंड्यांबरोबरच मिळेल त्याने भाविक देहूत दाखल झाले; त्यामुळे या वर्षी देहूतील बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल दिसून आली.

यात्रेनिमित्त बाजारआळीसह गावातील प्रमुख रस्त्यांवर विविध साहित्य विक्रीची सुमारे पाचशेहुन अधिक दुकाने थाटण्यात आली होती. गळ्यातील तुळशीच्या माळा, अष्टगंध, बुक्का, कुंकू, विविध देवतांच्या, संतांच्या प्रतिमा, मुलांसाठी खेळणी, महिलांसाठी पर्स, दागिने, चपला, बॅग आदी साहित्याची दुकाने सजली होती. या दुकानांवर खरेदीसाठी चांगलीच गर्दी झाली होती. ठिकठिकाणी मिठाई, चहा-नाष्टा, वडा-पाव आदी खाद्यपदार्थांची दुकानेही थाटण्यात आली होती. अनेकांना शनिवारी उपवास असल्यामुळे फराळाच्या पदार्थांनाही चांगलीच मागणी होती. देहूतील हॉटेले व उपाहारगृहे गर्दीने फुल्ल होती. प्रशासनाचे ढिसाळ नियोजन या वर्षी प्रकर्षाने जाणवले. पोलिसांचे संख्याबळ अत्यंत तोकडे होते. 

महाद्वारातून पालखी प्रस्थान ठेवते तेव्हा दरवर्षी पालखीभोवती दोरखंडाचे कडे तयार करून पोलिसही पालखी वैकुंठस्थान मंदिराकडे नेत असतात. यावर्षी मात्र, कुठल्याही बंदोबस्ताशिवाय पालखी नेण्यात आली. पोलिसांसोबत या वर्षी पोलिस मित्रांनीही बंदोबस्तात सहभाग घेतला. मात्र, त्यांचीही संख्या कमीच होती. वैकुंठस्थान मंदिराभोवती गर्दी आवरताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी दुपारी देहूला भेट दिली.

सोहळ्यापूर्वी गवत पेटले; वेळीच मदत मिळाल्याने अनर्थ टळला

वैकुंठस्थान मंदिरापासून काही अंतरावर अचानक गवत पेटल्याची घटना सकाळी 11 च्या सुमारास घडली. इकडे महाद्वारातून पालखीने प्रस्थान ठेवले होते; तर वैकुंठस्थान मंदिराजवळ भाविकांची गर्दी वाढत चालली होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा आगीचा बंब या वेळी पुलावर उभा होता. पोलिसांनी प्रसंगावधान राखून गर्दीतून वाट काढत हा बंब योग्य वेळी आगीच्या ठिकाणी नेला. वेळीच आग नियंत्रणात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.