होमपेज › Pune › पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्याच्या जमिनीचा आराखडा निश्‍चित

पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्याच्या जमिनीचा आराखडा निश्‍चित

Published On: May 06 2018 1:54AM | Last Updated: May 06 2018 1:08AMपुणे : प्रतिनिधी

पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येणार्‍या जमिनीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) आणि संबंधित विभागांतील अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यामध्ये भूसंपादन करण्याच्या जमिनीचा आराखडा सादर करण्यात आला.

बैठकीत विमानतळासाठी करण्यात येणारे भूसंपादन, प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणार्‍या परताव्यांचे पर्याय निश्चित करणे यावर चर्चा करण्यात आली. विमानतळासाठीच्या भूसंपादन करण्यात येणार्‍या दोन हजार 100 हेक्टर जमिनीचा एमएडीसी तयार करण्यात आला असून राज्य सरकारकडून भूसंपादनाची अधिसूचना काढल्यावर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

परताव्यांच्या पर्यायांचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिले गेल्यास आठवड्यात प्रकल्पग्रस्तांसाठी पर्याय तयार करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. सरकारकडून भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात आल्यावर भूसंपादनाची कार्यवाही केली जाईल. प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणार्‍या परताव्याचे पर्याय एमएडीसीने सादर करावेत. त्यानुसार जिल्हा प्रशासन हे भूसंपादन करणार आहे, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले. भूसंपादन करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली.