Tue, Mar 26, 2019 01:39होमपेज › Pune › राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी; फेसबुक पेज संचालित करणार्‍यांवर दुसरा गुन्‍हा

राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी; फेसबुक पेज संचालित करणार्‍यांवर दुसरा गुन्‍हा

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 07 2018 2:00AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांचे फोटो वापरून आक्षेपार्ह पोस्ट करून बदनामी केल्याप्रकरणी ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ या फेसबुक पेजच्या चालकाविरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारचा गुन्हा खडक पोलिस ठाण्यात मागील महिन्यात दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या शहराध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सिंहगड रोड पोलिस ठाण्यात हे फेसबुक पेज चालविणार्‍या अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाचा वापर करून ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ नावाने फेसबुक पेज सुरू आहे. या पेजवर कोरेगाव भीमा; तसेच वढू येथे दोन गटांत झालेल्या वादाचा संदर्भ देऊन राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष पवार आणि नेत्यांच्या नावाने त्यांच्या छायाचित्रांचा वापर करून आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. या अकाउंटवरून पक्षाच्या अन्य नेत्यांविरोधात सातत्याने आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात येत असल्यामुळे पक्षाची बदनामी होत आहे. म्हणून पोलिसांकडे फिर्याद दिली आहे, असे चाकणकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.