Fri, Apr 26, 2019 19:22होमपेज › Pune › भाजपा गटनेते भिमाले यांच्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला

भाजपा गटनेते भिमाले यांच्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला

Published On: May 29 2018 1:35AM | Last Updated: May 29 2018 12:53AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या मुख्यसभेत वादग्रस्त विधान केल्याच्या प्रकरणात भाजपाचे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या विरोधात काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सोमवारी अब्रु नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी सचिन आगरकर यांच्या न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला आहे. 

भिमाले यांच्याविरोधात शिंदे यांनी 23 मे रोजी पोलिसांत तक्रार दिली आहे. महापालिकेच्या 21 मे रोजी झालेल्या सभेत भिमाले यांनी शिंदे यांची ‘फ्रॉड’ हा शब्द वापरून बदनामी केली असल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे. शिंदें यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भिमाले यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंदही करण्यात आली होती. 

पालिकेतील अधिकारी किशोर पडळ हे भिमाले यांच्या कार्यालयात वेळेत न आल्याबद्दल त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर अरविंद शिंदे यांनी औचित्याचा मुद्दा असल्याचे नमूद करताना या विषयावर चर्चा घडवून आणली होती. त्यावेळी प्रश्‍नाला प्रत्यूत्‍तर देताना भिमाले चिडले आणि त्यांनी अरविंद शिंदे यांना उद्देशून अब्रुनुकसानी होईल अशी चार वाक्ये वापरली. नगरसेवक, अधिकारी आणि पत्रकारांसमोर भिमाले यांनी ही वाक्ये उच्चारली आहेत, त्यामुळे आपली बदनामी झाली आहे, असे शिंदे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी हा खटला दाखल केला आहे. तसेच लवकरच दिवाणी न्यायालयात 25 कोटी रूपयांचा मानहाणीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. ठोंबरे म्हणाले.