Sun, May 26, 2019 18:41होमपेज › Pune › इन्स्टाग्रामवरील खाते हॅक करून बदनामी

इन्स्टाग्रामवरील खाते हॅक करून बदनामी

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 09 2018 1:34AMपुणे : प्रतिनिधी 

एकतर्फी प्रेमातून तरुणीचे इन्स्टाग्रामवरील खाते हॅक करून फोटो मॉर्फ करत तरुणीची बदनामी करणार्‍या तरुणाला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. रोहित राजेंद्र पाटील (19, थळ, अलिबाग, रायगड) असे त्याचे नाव आहे.  

पिंपरी-चिंचवड परिसरातील मोहननगर भागात राहणार्‍या एका तरुणीचे इन्स्टाग्राम खाते हॅक करून तसेच तिचे फोटो मॉर्फ करून अश्‍लील फोटो तयार करत ते अपलोड करण्यात आले होते. याद्वारे तिची बदनामी करण्यात येत होती. त्यामुळे तरुणीने सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलिस उपनिरीक्षक मंदा नेवसे, कर्मचारी भूषण शेलार, महिला कर्मचारी ज्योती दिवाणे यांच्या पथकाने तांत्रिक तपास केल्यानंतर हा प्रकार रोहित पाटील याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने हा प्रकार केल्याचे कबूल केले. तरुणी व रोहित पाटील  एकाच गावात राहणारे आहेत. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. तिचा काहीही रिस्पॉन्स मिळत नसल्याने त्याने तिच्या इन्स्टाग्राम खात्याचा अनधिकृतपणे अ‍ॅक्सेस मिळवला. त्यानंतर त्यावर तिचे फोटो मॉर्फ करून अश्‍लील फोटो तयार करत त्या खात्यावर ते फोटो अपलोड करून तिची बदनामी करत होता.