होमपेज › Pune › बँकेची नोकरी सोडून घेतली चहाची किटली

बँकेची नोकरी सोडून घेतली चहाची किटली

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 24 2018 12:35AMवानवडी : सुरेश मोरे

बँकेची सुखवस्तू नोकरी..प्रेस्टिजियस अन् अगदी फिमेल डॉमिनेटेड जॉब असूनही दीपिका यांनी चक्क चहाचा व्यवसाय करायचे ठरवले आणि थाटले चक्क फिरते चहाचे दुकान. आलेल्या संकटामुळे खचून जाण्यापेक्षा प्रत्यक्षात कृती करायला हवी, या एकाच ध्येयाने प्रेरित दीपिका ही जबाबदारी अगदी लीलया पार पाडत आहेत.

स्वच्छ गणवेश, हातात किटली, अशा ‘स्टाईल’मध्ये आली चहावाली म्हणत दुकाने, बँका, शाळा, हॉस्पिटल, ज्येष्ठ नागरिकांच्या हास्य क्‍लबच्या आसपास मैदानात रेंगाळणारी चहावाली पाहून तिच्याबद्दल सर्वांनाच कुतूहल वाटते आहे. दीपिका कौर सिंग (29) यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले असून, मूळच्या आसामच्या असलेल्या त्या सध्या त्या नरेन हिल सोसायटीत राहतात. त्यांचे पती चाकण येथे काम करतात. दीपिका या महिंद्रा कोटक बँकेत असिस्टन्ट मॅनेजर कार्यरत होत्या. मात्र, महिना वीस हजाराची नोकरी सोडून त्यांनी हे आव्हान स्वीकारले.

दीपिका म्हणाल्या, माझ्यावर आलेली संकटे इतरांना सांगण्यापेक्षा संघर्ष करणेच मला पसंत आहे. काही कारणास्तव मी बँकेतील नोकरीला रामराम केला आणि चहाची किटली हातात धरली. पहिल्यांदा त्रास झाला मात्र, या व्यवसायामुळे मला नवनवीन नाती मिळाली. अनेकजण मला बेटी म्हणून आवाज देतात त्यावेळी छान वाटते. मी आसामची असल्यामुळे मला चहातील बारकावे माहीत आहेत. एका तासानंतरचा चहा आरोग्यास हानिकारक असल्यामुळे ताजा चहा बनवण्यावरच माझा भर असतो.