Fri, May 24, 2019 02:31होमपेज › Pune › कामासाठी चिडचिड करत असल्याने खून केल्याची मुंढेची कबूली

कामासाठी चिडचिड करत असल्याने खून केल्याची मुंढेची कबूली

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:41AMपुणे : प्रतिनिधी 

वारंवार कामासाठी चिडचिड करून कामाबद्दल इतरांना फोनवर माहिती देत असल्याचा राग मनात धरून ज्येष्ठ नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर (वय-65, रा. एरंडवणा) यांचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी केअरटेकरच्या पोलिस कोठडीत 19 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी स्मिता घाडगे यांनी दिला आहे.   

किसन अंकुश मुंढे (19, रा. तांबेवाडी, ता. भूम, जि. उस्मानाबाद) याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.   दिपाली कोल्हटकर यांचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत राहत्या घरात 9 फेब्रुवारी रोजी 11.30 वाजता आढळून आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी घटनेपूर्वी तीन दिवस कामाला लागलेल्या केअर टेकर मुंढे याला अटक केली. 

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्याला शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याने पोलिस कोठडीमध्ये दिपाली यांचा खून करून मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. घटनेच्या दिवशी त्याच्यात आणि दीपाली यांच्यात झटापटी झाली होती. त्यामध्ये मुंढे याच्या चेहरा आणि मानेवर जखमा झाल्या आहेत.

या जखमा घटनेच्या कालावधीत असल्याचे वैद्यकीय तपासात निष्पन्न झाले आहे. डोक्यावर जखम झाल्याने दीपाली यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. त्याने कोणत्या हत्याराने त्यांच्या डोक्यावर मारले, अशा विविध बाबींचा तपास करण्यासाठी त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहायक सरकारी वकील संध्या काळे यांनी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्‍तीवाद ग्राह्य धरून त्याला पोलिस कोठडीत वाढ केली.