Thu, Mar 21, 2019 15:28होमपेज › Pune › पंढरीच्या वारीतलं 'मेडीटेशन' 

ब्‍लॉग : पंढरीच्या वारीतलं 'मेडीटेशन' 

Published On: Jul 11 2018 9:19PM | Last Updated: Jul 11 2018 9:19PMदीनदयाळ वैद्य, पुणे

पुणे-सासवड वारीचं हे तिसरं वर्ष, ईशिताही सोबत होती. आमची तिसरी पिढी वारीत वगैरे म्हणणं भंपकपणा होईल. ईशिता नुकतीच उत्तरकाशीला पंधरा दिवसांचा ट्रेकिंगचाचा कोर्स करून आलीयं. तिथं जसे बारा-बारा किलोमीटरचे ट्रेक केलेस तसाच हा ट्रेक आहे समज आणि अनुभव घ्यायला चल म्हटल्यावर ती तयार झाली. सासवडला पोचेपर्यंत मला पक्कं समजलं की या एका वर्षात माझं वय जरा जास्तच वाढलंय. ईशिता मात्र मस्त चालली. न थांबता, न थकता.

आमची वारी म्हणजे ट्रेक. चालण्याचा, माणसांचा, त्यांच्या धुंदीचा अनुभव घेणं. दूरवरच्या खेड्यांतून-गावांतून आलेल्या माणसांचा स्पर्श आपल्याला होतो आणि वारीचा थोडाफार रंग कपड्यांवर आणि मनावर चढतो. तो घेऊन आपण मिरवायचं. रंग बाहेरून चढतो तेव्हा तो दिसतो, दाखवता येतो, मिरवता येतो. आतून भिनलेला रंग दिसत नाही, दाखवावा लागत नाही आणि मिरवावा असंही वाटत नाही. माझ्यावर चढलेला रंग पहिल्या प्रकारातला.

या वेळी ठरवलं होतं की कॅमेऱ्यातनं माणसांचे चेहरू टिपूया. वारीतली सगळ्यात आवडलेली गोष्ट ती आहे. ज्या माणसांचे फोटो क्वचित काढले जातात त्यांचे फोटो खूप छान येतात. खूप फोटो काढले गेल्यानंतर माणसं फोटोसाठीची उत्स्फूर्तता घालवून बसतात. मग त्यांचं हसणं, दिसणं वरवरचं वाटतं. वारकऱ्यांचे फोटो काढणारी मी काही पहिली व्यक्ती नाही. आणि वारकऱ्यांनाही त्याची सवय झालीय. पण तरीही मी ज्यांचे ज्यांचे फोटो काढले ते मला छान दिसले आणि मनाने मी मोकळा झालो. शहराच्या धबडग्यात सगळे चेहरे कावलेले, रागावलेले. अनोळखी माणसांनी आपल्याकडे पाहून हसणं हे वारीतलं मला जाणवलेलं 'मेडीटेशन' आहे. 

असे अनेक चेहरे मला दिसले. छोट्याछोट्या दिंड्यांमध्ये रेंगाळत मृदंग-टाळ-गाण्यांच्या-अभंगांच्या धुंदीत आम्ही चाललो. एका दिंडीत 'मन डोले मेरा तन डोले...' या गाण्याच्या चालीवर नागीन डान्स करत वारकरी विठ्ठलाला आळवत होते. या वेळी मला त्यांचा अजिबात राग आला नाही. हे माझं पूर्वग्रह दूर होणं आहे की त्यावेळची धुंदी? माहित नाही. ज्ञानेश्वरांच्या पालखीच्या वाटेवर माझं निरा गाव लागतं. एके वर्षी ईशिताला घेऊन मी निरेपर्यंत जाईन. मग आम्ही पंढरपूरला गेलो नाही तरी चालेल.

योगायोग असा की वारीच्या दुसऱ्याच दिवशी अंजलीला आणि मला ईशिताच्या शाळेनं पालखी सोहळ्यासाठी आमंत्रित केलं होतं. ईशिता दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिली आलीय. (कष्ट तिचे आणि मान आम्हाला.) तिथं पाचवी ते सातवीच्या मुलामुलींनी वारीचा सोहळा फार देखणा केला. आदल्या दिवशीच्या वारीचाच अनुभव मी तिथं घेत होतो. मुलांमुलींपुढे मला बोलायचं होतं. आयुष्यात पहिल्यांदा औपचारिक भाषण करायचं होतं. सकाळी पाचेक मिनिटं बसून मुद्देही काढले होते. पण प्रत्यक्षात माईकसमोर उभा राहिल्यानंतर माझी 'सीडी' अडकायची भीतीच जास्त होती. पण तसं नाही झालं. आईनानांकडून जे ऐकलं आणि वारीनं जे शिकवलं ते बाहेर आलं. सहजगत्या. इतकी उत्स्फूर्तता मी प्रथमच अनुभवली!

(सर्व फोटो दीनदयाळ वैद्य यांच्या फेसबुकवरून साभार)