Tue, Apr 23, 2019 18:24होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवडमध्ये कुष्ठरूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट

पिंपरी-चिंचवडमध्ये कुष्ठरूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट

Published On: Jan 31 2018 2:06AM | Last Updated: Jan 31 2018 2:06AMपिंपरी : वर्षा कांबळे 

गेल्या पाच वर्षांत राज्य शासनाच्या पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथकाने केलेल्या सर्वेक्षणात  पिंपरी-चिंचवड शहरात कुष्ठरोग्यांच्या प्रमाणात घट होत असल्याचे आढळून आले आहे. महापालिकेच्या ‘वायसीएम’ रुग्णालयात पथकाद्वारे केलेली जनजागृती आणि विविध उपक्रमांमुळे  शहरात कुष्ठरुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. 30 जानेवारी हा जागतिक कुष्ठरोग दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त घेतलेला हा आढावा...

पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथकातर्फे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्याचे कार्य सुरू आहे. या सर्वेक्षणासाठी पालिकेतर्फे आरोग्यसेवकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याद्वारे दररोज तपासणी केली जाते. कुष्ठरोगाबद्दल वस्त्यांमधील, झोपडपट्टीतील लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. या उपक्रमासाठी नियुक्त केलेल्या आरोग्यसेविका घरोघरी जाऊन तपासणी करतात; तसेच लोकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन रोगनिदान करावे यासाठी त्यांना प्रवृत्त केले जाते; तसेच प्रभातफेरी, प्रश्‍नमंजूषा, स्पर्धा, मजूरअड्डा, दारोदारी जाऊन, शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेतले जातात. 

2011 च्या सर्वेक्षणामध्ये कुष्ठरोगाचे एकूण  105 रुग्ण आढळून आले होते, तर 2012 मध्ये रुग्णांची संख्या 178 झाली होती. 2013 मध्ये 2013, 2014  साली 258 इतकी वाढली होती. त्यानंतर तीच रुग्णसंख्या 2015 व 2016 च्या सर्वेक्षणात 146 वर आली. सध्या 2017 च्या सर्वेक्षणात 91 कुष्ठरोगाचे रुग्ण आढळले आहेत. 2018 मध्ये 85 कुष्ठरोगाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. 

कुष्ठरोग हा आजार आनुवंशिक नसून, उपचाराच्या द‍ृष्टीने त्यांचे सांसर्गिक व असांसर्गिक अशा दोन प्रकारांत वर्गीकरण केले जाते. बहुविध उपचार पद्धतीने कुष्ठरोग निश्‍चित बरा होतो. या उपचाराने कुष्ठरोगातील विकृती टाळता येते. बहुविध उपचार पद्धती सर्व आरोग्य संस्थांत उपलब्ध आहे. अपूर्ण व अर्धवट उपचार घेतल्यास हात-पाय लुळे पडणे, हातापायाची बोटे वाकडी होऊन विकृती येऊ शकते. कुष्ठरोग्यास 1 ते 5 चट्टे असल्यास 6 महिन्यांचा उपचार आणि 5 पेक्षा जास्त चट्टे किंवा 1 पेक्षा जास्त मज्जा बाधित असल्यास 12 महिन्यांचा उपचार घ्यावा लागतो. प्राथमिक अवस्थेतील आजार हा 100 टक्के बरा होतो. 

कुष्ठरोग निर्मूलनासाठी जनजागृती सर्वांत प्रमुख माध्यम आहे. घरोघरी आणि  शालेय  सर्वेक्षण केले जाते.  शाळांमध्ये शंभर टक्के तपासणी होणे गरजेचे आहे. आपल्याकडे यंत्रणा कमी असल्यामुळे सर्वेक्षण करण्यास अडचणी येतात. त्यासाठी आपण झोपडपट्टी, वीटभट्टी अशा ठिकाणी राहणार्‍या नागरिकांचे सर्वेक्षण करतो. एखाद्या ठिकाणी कुष्ठरोगी सापडला, तरी त्या परिसरातील पन्नास घरांचे सर्वेक्षण करण्यात येते. 
    - डॉ. सुनील चिद्रावार, वैद्यकीय अधिकारी, 
जिल्हा केंद्रीय पथक कुष्ठरोग कार्यालय पुणे