Fri, Mar 22, 2019 01:48
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया घटल्या

कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया घटल्या

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 23 2018 8:56AMपुणे : प्रतिनिधी

केवळ दोन मुलांमधील पाळणा लांबविण्यासाठी वापरली जाणारी साधने आता कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांची जागा घेत आहेत.  पाळणा लांबविण्यासाठी लागणा-या महिलांसाठी मासिक व तातडीच्या गर्भनिरोधक गोळया, निरोध, तांबी ही साधने कुटुंब कल्याण विभागाने मोफत उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे महिलांचा कल नसबंदी शस्त्रक्रियांऐवजी ही साधने वापरण्यांकडे वाढत आहे. त्यामुळे राज्यात कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांमध्ये वर्षाकाठी दहा हजारांची घट होत आहे. 

पूर्वी पाळणा लांबविण्यासाठी फार थोड्या महिला तांबीचा तात्पुरता वापर करत. पण, आता नवीन आलेल्या तांबी या महिलांना तीन वर्षांपासून दहा वर्षांपर्यंत गर्भधारणा टाळण्यासाठी उपयोगी पडत आहेत. तसेच प्रसूतीनंतर बसवता येत असल्याने त्या महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. एक ते दोन मुले झाल्यानंतर त्यामुळे टाक्याची किंवा बिनटाक्याची शस्त्रक्रिया करून घेण्यापेक्षा महिला दोन ते तीन वेळा तांबी बसवून कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेला फाटा देत आहेत. हे कुटूंब कल्याण विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. पूर्वी केवळ शस्त्रक्रिया करणे हाच एकमेव पर्याय महिलांपुढे उपलब्ध होता; पण आता तो ट्रेंड मागे पडत असल्याची माहिती कुटुंब कल्याण विभागाचे सहायक संचालक डॉ. नंदकुमार देशमुख यांनी दिली. 

सन 2014- 15 मध्ये राज्यात केवळ 3 हजार 443 महिलांनी प्रसूतीपश्‍चात तांबी बसवली होती. तीच संख्या दुस-या वर्षी (2015-16) तीस हजार झाली. 2016-17 मध्ये हा आकडा एक लाख तीन हजारांवर पोचला आहे. 

यासाठी त्याचबरोबर इतर वेळी गर्भनिरोधक गोळ्या आणि तांबी बसविण्यातही महिलांची संख्या लाखांमध्ये आहे. या साधनांचा प्रचार आणि प्रसार शहरी आणि ग्रामीण भागात होण्यासाठी डॉ. देशमुख यांनी प्रयत्न केले आहेत. सुदृढ मुल जन्माला घालण्यासाठी व पर्यायाने माता मृत्यू रोखण्यासाठी दोन मुलांमध्ये अंतर ठेवणे आवश्यक असते. म्हणून या तात्पुरत्या व सुरक्षित असणा-या गर्भनिरोधक साधणांचा वापर महिलांनी करणे गरजेचे आहे. 2014-15 मध्ये 4.72 लाख महिलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्या. दुस-या वर्षी त्यामध्ये घट होऊन 4.61 लाख, तर 2016-17 मध्ये आणखी दहा हजारांची घट होऊन ही संख्या 4.52 लाख झाली.