Wed, May 22, 2019 10:21होमपेज › Pune › बासमती तांदळाच्या उत्पादनात घट

बासमती तांदळाच्या उत्पादनात घट

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 15 2017 12:32AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

बासमती तांदळावर झालेले संशोधन आणि नव्या जातींमधून निघणारे भरघोस उत्पादन यामुळे गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक बासमती तांदळाच्या उत्पादनात घट होत आहे. संशोधनाद्वारे विकसित करण्यात आलेल्या 1121 बासमती आणि 1509 बासमती या नवीन जातींपासून कमी वेळेत जास्त उत्पादन निघत असल्याने या तांदळाचे उत्पादन घेण्याकडे शेतकर्‍यांचा ओढा वाढत चालला आहे. परिणामी, देशभरात पारंपरिक तांदळाच्या लावगवडीचे क्षेत्र कमी होत असून निर्यात अवघी 5 टक्क्यांवर आली असल्याची माहिती फॅमचे अध्यक्ष राजेश शहा यांनी दिली.

गेल्या काही दशकांमध्ये बासमती तांदळाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने तांदळावर संशोधन करत 1121 बासमती आणि 1509 बासमती या नवीन संकरीत जाती निर्माण करण्यात आल्या. बासमती तांदळाच्या विशिष्ट गुणांमुळे महाराष्ट्रात हा तांदूळ लोकप्रिय झाला. 

सध्यस्थितीत पश्चिम आशिया, अमेरिका, युरोप, ब्रिटन या देशांना पारंपारिक तर इराण, इराक, सौदी अरेबिया आणि आखाती देश येथे 1121 आणि सेला बासमतीची निर्यात होते. मात्र, गेल्या 4 ते 5 वर्षांपासून पारंपरिक बासमती तांदळाची उपलब्धता कमी होत असल्याने बासमती तांदूळ निर्यातीत पारंपारिक तांदळाचा वाटा फक्त 5 टक्के राहिला आहे. 

देशातून सर्वाधिक निर्यात 1121 बासमती आणि सेला बासमती तांदळाची होत असून त्या खालोखाल स्टीम बासमती तांदळाला परदेशातून मागणी आहे. साधारणत: एका हेक्टरमध्ये पारंपारिक बासमतीच्या तांदळाचे 3.50 टन उत्पादन निघते. तर, 1121 बासमती 4.50 टन आणि 1509 बासमती 6.50 टन इतके उत्पादन देतात. ते पारंपरिक तांदळाच्या तुलनेत जास्त असल्याने पारंपारिक बासमतीची लागवड कमी होत आहे. 

बाजारात 1121, 1509 व सुगंधा स्टीम बासमतीचे तुकडे पारंपारिक बासमतीच्या तुकड्यांच्या तुलनेत जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु, पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः पुण्यात स्टीम बासमती तुकडे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले नाहीत. पारंपारिक बासमती तुकड्यांच्या तुलनेत स्टीम बासमती तुकडे चवीत कमी असल्यामुळे, शिवाय, शिजवल्यानंतर काही वेळाने स्टीम बासमती तुकड्यांची शिते कडक होत असल्यामुळे ग्राहक स्टीम बासमती तांदळाचे तुकडे घेण्याचे टाळतात. 

पारंपारिक बासमती तुकड्यांचे कमी झालेले प्रमाण व स्टीम बासमती तुकडे पसंतीस उतरत नसल्यामुळे ग्राहकांचा कल आंबेमोहोर, चिनोर, लचकारी कोलम, कोलम इत्यादि बिगर बासमती तांदूळ वापरण्याकडे असल्याचेही शहा यांनी नमूद केले.