Sun, Aug 25, 2019 12:18होमपेज › Pune › सोशल मीडियावर घुमला मराठीचा जयघोष

सोशल मीडियावर घुमला मराठीचा जयघोष

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 26 2017 12:16AM

बुकमार्क करा

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

खासगी क्षेत्रातील कंपनीला ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर शाळा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यापाठोपाठ कमी पटसंख्येचे कारण देत 1300 मराठी शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त पसरले याविरोधात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्याची दखल घेतली. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी दगडी इमारतीतून 1 किलोमीटर जवळच्या चांगल्या शाळेत नेत असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सोशल मीडियावर दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

प्राथमिक शिक्षण, आरोग्य या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाची आहे; पण सरकारला त्याचा विसर पडला आहे. त्यातून नवा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यापुढे खासगी क्षेत्रातील कंपनीला इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करता येणार आहे. यासंदर्भातील सुधारणा विधेयक नुकतेच विधानसभेत संमत झाले. या विधेयकानुसार खासगी कंपन्यांना महापालिका; तसेच नगरपालिका क्षेत्रात 500 चौरस मीटर, तर इतरत्र एक एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर नव्या शाळा सुरू करता येतील. प्रचलित नियमानुसार शाळा सुरू करण्यासाठी नोंदणीकृत न्यास, संस्थांनाच अर्ज करता येतो.

आता यात बदल करण्यात आला आहे. कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 नुसार स्थापन केलेल्या कंपनीस शाळा सुरू करण्यास परवानगी मिळणार आहे. त्यापाठोपाठ राज्यातील 1300 मराठी शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याविरोधात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. गोरगरिबांची मुले शिक्षण घेत असलेल्या मराठी प्राथमिक शाळा बंद करू नयेत याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दि. 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळात ट्विटर व फेसबुकवर ‘हॅश टॅग सेव्ह स्कूल’ चालला.  ‘हॅश टॅग’ चालविताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा मोबाइल नंबर देऊन  मराठी शाळा वाचवा असा एसएमएसचे करण्याचे आवाहन केले गेले. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला.  

मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी दगडी इमारत बंद करतोय आणि मुलांना 1 किलोमीटर जवळच्या चांगल्या शाळेत नेतोय, चालेल ना, असा सवाल शिक्षणमंत्री तावडे यांनी केला. तावडे यांनी पाठविलेल्या मेसेजमध्ये शुद्धलेखनाच्या अनेक चुका राहिल्याचे सोशल मीडियावर तावडे यांच्या निदर्शनास आणून दिले गेले. त्यावर दुरुस्त करा आणि पुढे पाठवा, मुद्दे पटले ना, असे तावडे यांनी विचारले.

अभियान यशस्वी

एकूणच  गोरगरिबांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ नका. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, हा संदेश देण्यासाठी सोशल मीडियावर चालविण्यात आलेले हे अभियान चांगलेच यशस्वी झाले.