Wed, Mar 20, 2019 09:00होमपेज › Pune › दोन उन्हाळी आर्वतनातून दौंड, इंदापूरला ७.१० टीएमसी पाणी 

दोन उन्हाळी आर्वतनातून दौंड, इंदापूरला ७.१० टीएमसी पाणी 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

दोन उन्हाळी आर्वतनातून दौंड, इंदापूरला शेती व पिण्यासाठी ७.१० टीएमसी पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतलेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 

व्हीआयपी विश्रामगृहात झालेल्या कालवा समितीच्या बैठकीला महापौर मुक्ता टिळक, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, राहुल कुल, भीमराव तापकीर, मेधा कुलकर्णी, विजय काळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नानासाहेब देवकाते, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी पांडूरंग शेलार, यांच्यासह पाटबंधारे खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

चालू वर्षी राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने सर्व धरणे १०० टक्के भरली होती. यामुळे एप्रिल उजाडला, तरी पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला प्रकल्पांतील धरणांमध्ये एकूण आजअखेर १४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यातील सुमारे ७.१०  टीएमसी पाणी दौंड, इंदापूर, हवेली तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. यामधून दोन आर्वतन देण्यात येणार आहे. पहिले आर्वतन ५५ दिवस देण्यात येणार आहे. तर दुसरे आर्वतन २० मे रोजी पासून सोडण्यात येणार आहे.  तर ६ टीएमसी पिण्यासाठी महापालिकेसाठी राखीव ठेवले आहे. तर उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता सुमारे १ टीएमसीपर्यंत पाण्याचे बाष्पीभवन होईल, असे पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

...रब्बीतील बचतीचे पाणी द्या

रब्बीमध्ये दौंड आणि इंदापूरकरांनी तब्बल अडीच टीएमसी पाणीसाठा वाचवला आहे. हा वाचविलेला पाणीसाठा उन्हाळी हंगामाकरिता सोडण्यात यावा. आम्ही जास्तीचे पाणी मागत नाही. आमच्या हक्काचे पाणी मागत आहे. ते आम्हाला मिळाले पाहिजे यामध्ये कोणतीही दुमत नाही. अधिकारी पाणी वाटप करीत असताना पेच निर्माण करतात. यामुळे पाणी सोडताना अडचणी निर्माण होतात. याकडे जलसंपदामंत्र्यांनी लक्ष घालावे. ५.१० टीएमसी पाणी रब्बीमध्ये दौंड आणि इंदापूरला सोडण्यात आले होते.  या दरम्यान अडीच टीएमसी पाणी वाचविले आहे. यापाण्यावर आमचा हक्क आहे.  - राहुल कुल (आमदार दौंड)

पाण्याची बचत केली अधिक मिळालेच पाहिजे

रब्बीमध्ये जिल्ह्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात पाणी वाचविले आहे. हे वाचविलेले अधिकचे पाणी आमच्या हक्काचे आहे. त्यामुळे हे पाणी आणि नियोजनात ठरलेले पाणी आम्हाला मिळाले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत इंदापूरांच्यावरील अन्याय सहन केला जाणार नाही. ठरलेल्या प्रमाणे ७.१० टीएमसी पाणी आम्हाला देण्यात यावे. या संदर्भात अधिकार्‍यांनी काटकोर नियोजन करणे आवश्यक आहे. कोणत्याही अधिकार्‍यांनी निष्काळजीपणा करु नये. शेतकर्‍यांना उन्हाळ्यातील हे दोन आर्वतन अतिशय महत्वाची असतात. या दोन महिन्यात वर्षभर जपलेली पीक वाचविण्यासाठी पाणी आवश्यक असते. यामुळे वेळचे नियोजन करुन पाणी सर्वांच्यापर्यंत पोहचेल याची काळजी घ्यावी  - दत्तात्रय भरणे (आमदार इंदापूर) 

महत्वाचे मुद्दे

खडकवासालातील २ आर्वतन २० मे नंतर
भामा आसखेडचा पुर्नवसनासाठी स्वतंत्र बैठक
चासकमानची गळती तातडीने थांबवा

 

Tags : pune, pune news, Daund Indapur, farmer, water, summer arvatana, 


  •