Sun, Jul 21, 2019 09:54होमपेज › Pune › डेक्‍कन क्वीनची सूत्रे महिलांकडे!

डेक्‍कन क्वीनची सूत्रे महिलांकडे!

Published On: Mar 08 2018 1:20AM | Last Updated: Mar 08 2018 12:31AMपुणे : प्रतिनिधी 

बहुप्रतिष्ठित डेक्‍कन क्वीन एक्स्प्रेसची सूत्रे आज (गुरुवार, दि. 8) महिलांकडे देण्यात येणार आहेत. महिला दिनाचे औचित्य साधत मध्य रेल्वेकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुंबईहून सायंकाळी 5.10 वाजता सुटणार्‍या डेक्कन क्वीनमधील सर्व कर्मचारी महिला असणार असून, केबिन क्—यू म्हणून सुरेखा यादव, तृष्णा जोशी, श्‍वेता घोणे, आरपीएफ (महिला कॉन्स्टेबल) म्हणून स्म्रिती सिंग, ज्योती सिंग, पिंकी जत, सरिता सिंग, महिला पोलिस उपनिरीक्षक म्हणून कविता साहू, तिकीट तपासणीस किंवा कमर्शियल स्टाफ म्हणून शांती बाला, एस. पी. राजहंश, गीता कुरुप, मेधा पवार आणि इलेक्ट्रिकल टेक्निशियन म्हणून योगिता राणे काम पाहणार आहेत. 

दरम्यान, मुंबई विभागाकडून महिलादिनी हे स्तुत्य पाऊल उचलण्यात आले असले तरी पुण्याहून मुंबईला जाणार्‍या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये मात्र याची अंमलबजावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पुणे विभागाचा उदासीन कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आज महिला पुरुषांपेक्षा काकणभर सरस काम करीत आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे; मात्र जी डेक्कन क्वीन पुण्याची शान आहे, तिला महिला कर्मचार्‍यांच्या हस्ते ओवाळले असते तर महिलांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असता. मात्र पुणे विभागाने ती संधी दवडली आहे, असे मत रेल्वे तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

लोणावळा लोकलमध्ये महिला ‘टीसी’

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत पुण्याहून लोणावळ्याला सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी सुटणार्‍या लोकलमध्ये आज (गुरुवार, दि. 8) महिला तिकीट तपासणीस (टीसी) व गार्ड असणार आहेत, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली. तर पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस व मुंबईहून सुटणार्‍या कोयना एक्स्प्रेसमध्ये देखील महिलांच्या हाती टीसीचे कार्य सोपवले जाणार असून, पुण्यातील डिझेल लोकोशेडमध्ये महिला कर्मचारी काम पाहणार असल्याची माहिती देण्यात आली.