Mon, Aug 19, 2019 00:40होमपेज › Pune › कर्ज वसुलीने ‘रुपी’च्या आशा पल्लवित

कर्ज वसुलीने ‘रुपी’च्या आशा पल्लवित

Published On: May 11 2018 1:25AM | Last Updated: May 11 2018 1:21AM पुणे : प्रतिनिधी

आर्थिक अडचणीतील रुपी बँकेंच्या प्रशासकीय मंडळाने थकित कर्जापोटी आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये सुमारे 42 कोटी 80 लाख रुपयांची वसुली केली असून, या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण अहवालानुसार 5 कोटी 46 लाख रुपयांचा परिचलनात्मक (ऑपरेटिंग प्रॉफिट) तथा चालू नफा झाला असल्याने ‘रुपी’च्या पुनरुज्जीवनाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.बँकेंच्या ठेवी व इतर देय रक्कम आणि बँकेंची मालमत्ता यातील फरक 20 कोटी रुपयांनी कमी होऊन ती आता 440 कोटी रुपयांवर आलेली आहेत. बँकेंने एकूण 120 थकबाकीदारांच्या 238 मालमत्तांवर टाच आणली असून, या मालमत्तांचे अंदाजे मुल्य 123 कोटी रुपये आहे. बँकेंने संचालक, अधिकारी व थकबाकीदारांच्या एकूण 100 कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्ती नोटिसाही बजावल्या आहेत व त्यातून कर्ज वसुलीची होण्याची अपेक्षा आहे. 

चालू वर्षात म्हणजे 2018-19 मध्ये 55 कोटी रुपयांच्या थकीत कर्ज वसुलीची अपेक्षा असून सप्टेंबर 2018 पर्यंत किमान 30 कोटींची कर्जवसुली होण्याची अपेक्षा असल्याची माहिती बँकेंच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित यांनी दिली.

या बँकेंचे विलिनीकरण लवकरात लवकर होण्यासाठी प्रशासक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत थकित कर्जांच्या वसुलीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यास यश आल्यामुळे तीन बँकांनी विलिनीकरणाची तयारीही दर्शविली आहे. आरबीआयच्या सर्वकष आदेशान्वये बंधनांची मुदत 31 मे 2018 रोजी संपत आहे. त्यामुळे विलिनीकरणासाठी आरबीआय, राज्य सरकार, सहकार विभाग आणि बँकेंच्या प्रशासकीय मंडळाची संयुक्त बैठक तत्काळ घेण्यासाठी विनंती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
 
रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेंच्या 1380 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यापैकी बँकेंला 1373 कोटी रुपये देणे आहे. वसूल होणारी कर्जे, बँकेंची सरकारी रोख्यातील गुंतवणूक, रोख शिल्लक व बँकेंची मालमत्ता यांची एकूण रक्कम 924 कोटी रुपये आहे. म्हणजेच बँकेंला 440 कोटी रुपयांची तूट येत आहे. यापैकी केंद्र सरकारचे ठेव विमा महामंडळाकडून विलिनीकरण करुन घेणार्‍या बँकेंस, किमान 230 कोटी रुपये मिळू शकतात. याचा विचार करता 210 कोटी रुपयांची निव्वळ तूट राहते. त्यामुळे विलीनीकरणाचा मार्ग अधिक सुलभ झालेला आहे.

- सुधीर पंडित, 

अध्यक्ष, प्रशासकीय मंडळ