Wed, Jul 17, 2019 18:00होमपेज › Pune › डेबिट, क्रेडिट कार्डचा पासवर्ड चोरून फसवणूक

डेबिट, क्रेडिट कार्डचा पासवर्ड चोरून फसवणूक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यानंतर बिल भरण्यासाठी डेबिट, क्रेडिट कार्ड दिल्यानंतर छुप्या कॅमेर्‍याद्वारे पासवर्ड चोरून, बनावट कार्डचा वापर करून अनेकांची फसवणूक करणार्‍या हॉटेलच्या वेटरला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या महाठगाकडे सुमारे 400 बनावट कार्डे आढळून आलेली आहेत. हिंजवडी येथील झक्कास हॉटेलमध्ये तीन दिवसांपासून हा कामाला आला होता.

विकी रामअवतार अगरवाल (36, रा. कोणार्क पूरम सोसायटी, कोंढवा) या महाठगास अटक केली आहे, तर याप्रकरणी हॉटेल मालक गणेश पाटील (37, रा. हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी अगरवाल हा हिंजवडी येथील हॉटेल झक्कास येथे तीन दिवसांपासून वेटर म्हणून काम करत होता. तो काम करत असताना हॉटेलमधील बिल भरण्यासाठी ग्राहकांनी दिलेल्या डेबिट, क्रेडिट कार्डचा पासवर्ड आणि डाटा चोरत होता. कार्ड स्वॅप करत असताना छुप्या बटण कॅमेर्‍याद्वारे कार्डची सगळी माहिती सेव्ह करून ठेवत होता. याबाबत पाटील यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

हिंजवडी पोलिसांनी तत्काळ तपास करून अगरवाल याला अटक केली. त्याची आणि तो राहत असलेल्या ठिकाणची झडती घेतली असता त्याच्याकडे काही बनावट कार्डे आढळून आली; तसेच छुपा कॅमेराही आढळून आला. ग्राहक बिल भरत असताना त्यांनी दिलेल्या कार्डची माहिती आणि पासवर्ड टाकत असताना त्याच्याजवळील छुप्या कॅमेर्‍यात तो ती सर्व माहिती बरोबर चित्रीकरण करत होता. त्यानंतर घरी गेल्यानंतर ही सर्व माहिती स्वतःच्या लॅपटॉपमध्ये ‘सेव्ह’ करून ठेवत असे. त्याच्याकडे वेगवेगळ्या बँकेची बनावट डेबिट, कार्डे होती. ग्राहकांची मिळालेली गोपनीय माहिती या बनावट कार्डमध्ये भरून त्या कार्डद्वारे ठिकठिकाणी तो खरेदी करत असे. वेगवेगळ्या ठिकाणी अशा कार्डचा वापर करून ग्राहकांची तो फसवणूक करतो.

हिंजवडी पोलिसांना त्याच्याकडे सापडलेल्या सुमारे 400 कार्डपैकी 25 कार्डचा त्याने फसवणुकीसाठी अशा प्रकारे वापर केल्याचे समोर आले आहे.