Wed, May 22, 2019 22:20होमपेज › Pune › राष्ट्रवादीत इच्छुकांचा पक्षांतर्गत हल्लाबोल

राष्ट्रवादीत इच्छुकांचा पक्षांतर्गत हल्लाबोल

Published On: Apr 14 2018 10:30AM | Last Updated: Apr 14 2018 12:12AMपुणे : पांडुरंग सांडभोर

केंद्र आणि राज्य सरकारच्या फसव्या धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरात दोन ठिकाणी हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने जाहीरसभा घेतल्या; मात्र, या जाहीर सभांमध्ये आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर इच्छुकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यावरून काही ठिकाणीतर थेट इच्छुकांमध्ये शह-काटशहाचे राजकारणही झाले. त्यामुळे यानिमित्ताने राष्ट्रवादीचा पक्षांतर्गत ‘हल्लाबोल’ पहायला मिळाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभर हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पहिल्या टप्यात पुणे शहरात दोन जाहीर सभा या आठवड्यात झाल्या. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी या सभांना हजेरी लावली. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुक असलेल्यांनी यासंधीचा चांगलाच फायदा उठविला, त्यावरून थेट पक्षातंर्गत गटबाजीही दिसून आली. 

प्रामुख्याने पुणे शहरात येणार्‍या आठ विधानसभा मतदारसंघापैकी खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी आणि पर्वती या चार मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यामुळे या चारही मतदारसंघांमध्ये इच्छुकांची संख्याही तितकीच मोठी आहे. यापुर्वी पक्षांतर्गत गटबाजीमुळे आणि इच्छुकांच्या आपापसातील मतभेदांमुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीला यश मिळू शकलेले नाही. ही वस्तुस्थिती आहे. आगामी निवडणूकीतही हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचे चित्र नुकत्याच झालेल्या हल्लाबोल आंदोलनांच्या जाहीर सभांमध्ये पहायला मिळाले.

हल्लाबोलची पहिली जाहीर सभा वारजे येथे झाली, यासभेत खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार नगरसेवक सचिन बराटे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यामुळे अन्य इच्छुकांच्या पोटात नक्कीच गोळा आला असेल अशीच अवस्था होती. 

या मतदारसंघातील अन्य इच्छुकांनी मोठमोठ्या होर्डिंगजमधून शक्ती प्रदर्शनाचा मार्ग निवडला. याव्यतिरिक्‍त माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक दिपक मानकर यांनीही या सभेत जोरदार शक्ती प्रदर्शन करून, आपली ताकद दाखविली. मात्र, ते नक्की कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार याचे पत्ते अद्याप त्यांनी उघडे केलेले नाहीत. पर्वती मतदारसंघात आश्‍विनी कदम यांनी मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते नेत, आपणही उमेदवारीच्या शर्यतीत आहोत, हे नेते मंडळींच्या निदर्शनास आणून दिले.

हल्लाबोलची दुसरी सभा वडगाव शेरी मतदारसंघात खराडी येथे झाली, येथेही हेच चित्र होते. सभेच्या आयोजनाची जबाबदारी असलेल्या माजी आमदार बापु पठारे यांनीही शक्ती प्रदर्शनाचा जोरदार प्रयत्न केला. याठिकाणी उमेदवारीचे आणखी एक दावेदार असलेले नगरसेवक सुनिल टिंगरे यांनीही पठारेंच्या घरच्या मैदानावर जात, शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद दाखविली. हडपसर मतदारसंघातही हीच परिस्थिती पहायला मिळाली. याठिकाणी विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी महापौर वैशाली बनकर, माजी उपमहापौर निलेश मगर, आदींचे शक्तीप्रदर्शन हल्लाबोलच्या ‘बॅनरबाजी’तून दिसून येते होते. एकंदरीतच हल्लाबोलच्या निमित्ताने आगामी विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुक कामाला लागल्याचे पहायला मिळाले. मात्र, यानिमित्ताने पक्षातंर्गत गटबाजीला उधाण आले आहे.

अजित पवारांचा सावध पवित्रा

वारजें येथील सभेत यांनी नगरसेवक दोडके यांनी ‘दादा तुम्ही फक्त लढ म्हणा, आम्ही गेलेला खडकवासला पुन्हा जिंकून आणू’असे असे वक्तव्य केले. त्यावर अजित पवार यांनी सावध पवित्रा घेत मी खडकवासला मतदारसंघात अदयापपर्यंत तरी, कोणाचीही उमेदवारी जाहीर केलेले नाही असे स्पष्ट केले. खराडीच्या सभेतही पवार यांनी  पठारे आणि टिंगरे यांच्याबाबतही असाच पवित्रा घेत दोघांचा नामोल्लेख टाळला.

खराडीत इच्छुकांचे होर्डिग युध्द

खराडी येथे जाहीर सभेसाठी पठारे आणि टिंगरे यांच्यात जाहीरातींचे ‘होर्डिंग युध्द’ पहायला मिळाले. सभेच्या आदल्या रात्री खराडी येथे लावलेले नगरसेवक टिंगरे यांचे होर्डिंग फाडण्याचा प्रकार घडला. पक्षांतर्गत वादातूनच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. तर येथील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर टिका करणारे होर्डिंग भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या सांगण्यावरून काढण्यात आले.