Mon, May 20, 2019 20:08होमपेज › Pune › पुण्यात स्वाइन फ्लूने तीन महिलांचा मृत्यू

पुण्यात स्वाइन फ्लूने तीन महिलांचा मृत्यू

Published On: Aug 24 2018 12:46AM | Last Updated: Aug 24 2018 12:33AMपुणे : प्रतिनिधी

स्वाइन फ्लूने ऑगस्ट महिन्यात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक महिला उस्मानाबाद, दुसरी हडपसर, तर तिसरी शिवाजीनगर येथील राहणारी होती. सध्या 11 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. मृत्यू झालेल्या महिलांपैकी तिघींनाही उपचारादरम्यान न्यूमोनिया झाला होता, तर देाघींचे अवयव निकामी झाले होते. 

मूळ येवती, उस्मानाबाद येथील 36 वर्षीय महिलेचा 3 ऑगस्टला शहरातील पुणे स्टेशन जवळील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. सुरुवातीला तिला सोलापूर येथील रुग्णालयात दाखल केले असता, 22 जुलै रोजी स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले होते. नंतर या महिलेला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान स्वाइन  फ्लूसह न्युमोनिया, सेप्टीसेमिया आणि विविध अवयव निकामी झाल्याने 3 ऑगस्टला रात्री एक वाजता मृत्यू झाला. मॉडेल कॉलनी शिवाजीनगर येथे राहणार्‍या एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू  19 ऑगस्टला सकाळी कर्वे रोडवरील खासगी रुग्णालयात झाला. तिला 18 ऑगस्ट रोजी स्वाइन  फ्लू झाल्याचे निदान करण्यात आले होते. या महिलेला आधीपासूनच मधुमेह, उच्च रक्‍तदाब हा त्रास होता. तसेच तिची हृदयाची शस्त्रक्रियाही झाली होती. अठरा ऑगस्ट रोजी सकाळी तीव्र श्‍वसनविकार, स्वाईन फ्लू, न्युमोनिया आणि विविध अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. हडपसर येथील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू 21 ऑगस्ट रोजी एरंडवणे येथील खासगी रुग्णालयात झाला. या महिलेला पुर्वीचा कोणताही आजार नव्हता. 14 ऑगस्ट रोजी तिला स्वाइन फ्लू झाल्याचे निदान करण्यात आले होते. स्वाइन फ्लूसह तीव्र श्‍वसनविकार, न्युमोनिया, सेप्सिस यामुळे तिचा मृत्यू  झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

अकार रुग्ण व्हेंटिलेटरवर

शहरात सध्या विविध रुग्णालयांत स्वाइन फ्लूचे 15 रुग्ण उपचार घेत अहेत. त्यातील 11 रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. आतापर्यंत 36 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या वर्षी आतापर्यंतस्वाइन  फ्लूच्या संशयावरुन 5 लाख 61 हजार 817 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 5 हजार 374 जणांना टॅमी फ्लू औषध देण्यात आले. त्यातील आठशे रुग्णांच्या घशातील द्रव पदार्थाची तपासणी करण्यात आली असून, यातील 36 रुग्णांना स्वाइन  फ्लू असल्याचे स्पष्ट झाले. तर बुधवारी 3 हजार 258 जणांची तपासणी केली आहे. त्यातील 34 जणांना टॅमी फ्लू औषध देण्यात आले. तर, 5 जणांच्या घशातील द्रव पदार्थाची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्यातील 4 जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

पिंपरीत आणखी चार पॉझिटिव्ह रुग्ण

पिंपरी : पिंपरी -चिंचवड शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. या व्हायरसने पुन्हा डोके वर काढले आहे. दररोज एक तरी संशयित रुग्ण सापडतो किंवा एखाद्या रुग्णांचा मृत्यू होतो, अशी परिस्थिती आहे. गुरुवार आणखी चार स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडले आहेत.  सध्या वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्लू आणखी सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर बचाव आणि सावधगिरीच यावरील उपाय आहे असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.  शहरात स्वाईन फ्लूने सध्या 3 जणांचा बळी घेतला आहे. तर 105 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 28 पॉझिटिव्ह रुग्ण  आढळले आहेत. स्वाईन फ्लूचा धोका लक्षात घेता लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. चिन्हे आणि लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंंभीर होऊ शकते. स्वाईन फ्लूची कोणतीही लक्षणे दोन किंवा तीन दिवस अधिक टिकून राहिली, तर त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत असा, सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.