Mon, Jun 24, 2019 16:35होमपेज › Pune › वेळेत उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेचा मृत्यू

वेळेत उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेचा मृत्यू

Published On: Mar 24 2018 1:52AM | Last Updated: Mar 24 2018 1:06AMयेरवडा : वार्ताहर

येरवडा येथील महापालिकेच्या राजीव गांधी रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी ड्युटीवर वेळेत हजर नसल्यामुळे प्रसुतीसाठी दाखल केलेल्या नऊ महिन्याच्या गरोदर तरूण महिलेचा उपचाराविना मृत्यू झाला. या गंभीर प्रकरणास जबाबदार असणार्‍या महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय बडे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ‘एमआयएम’ पक्षाच्या गटनेत्या अश्विनी लांडगे यांनी केली आहे.

शुभांगी राजाराम जानकर (20, रा. आनंद पार्क, धानोरी) असे गरोदर मृत महिलेचे नाव आहे. शुभांगी या नऊ महिन्याच्या गरोदर होत्या. गुरूवारी रात्री आठच्या सुमारास त्यांना बेशुद्ध अवस्थेत राजीव गांधी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याठिकाणी नेमणुकीस असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. बडे यांची सायंकाळी पाचची ड्युटी असताना ते  रूग्णालयात ड्युटीवर हजर नव्हते. त्याठिकाणी असणार्‍या परिचारिकांनी शुभांगी ही अत्यवस्थेत असल्याबाबत फोनवरून डॉ. बडे यांना तातडीने माहिती दिली. त्यावेळी डॉ. बडे यांनी आपल्याला उशिर होणार असून शुभांगीला इतर रूग्णालयात दाखल करण्यास परिचारिकांना सांगितले. अत्यवस्थेत असणार्‍या शुभांगीला नातेवाईकांनी ससून रूग्णालयात नेले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर त्यांच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. राजीव गांधी रूग्णालयातच डॉ. बडे उपस्थित असते तर कदाचित वेळेत उपचार होवून शुभांगी हिचा व बाळाचा जीव वाचला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 

रूग्णांच्या नातेवाईकांनी झालेला प्रकार ‘एमआयएम’च्या नगरसेविका अश्विनी लांडगे यांना सांगितला. लांडगे यांनी तातडीने सदर प्रकार महापालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिला. महापालिकेच्या प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी शुक्रवारी चौकशीसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील आंधळे, डॉ. दीपक बखाले यांना पाठविले. या दोघांनी चौकशी केली असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. बडे हे ड्युटीवर वेळेत उपस्थित नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत डॉ. आंधळे म्हणाले, “शुभांगी यांच्या गरोदरपणाचे उपचार याच रूग्णालयात सुरू होते. त्यांना येथे दाखल केले होते, त्यावेळी त्यांचा रक्‍तदाब वाढलेला होता. आपण सदरचा अहवाल आरोग्य प्रमुख डॉ. साबणे यांना देणार आहोत”

नगरसेविका अश्विनी लांडगे म्हणाल्या, वैद्यकीय अधिकारी डॉ. बडे यांची डयुटी सायंकाळी पाच ते सकाळी आठ पर्यंत होती. ते रात्री साडेनऊच्या सुमारास आले. रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपली चोरी पकडली जाणार या भितीने त्यांनी रात्रीच फुटेजमध्ये छेडछाड केली आहे. याशिवाय ते उशिरा आलेले रूग्णालयातील परिचारिकाच सांगतात. त्यामुळे डॉ. बडे यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. महापालिकेत देखील हा प्रश्न आपण उचलून धरणार असल्याचे लांडगे यांनी सांगितले. यावेळी डॅनीयल लांडगे, शैलेंद्र भोसले, अकबर खान आदी उपस्थित होते. 

याबाबत बोलताना प्रभागरी आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, राजीव गांधी रूग्णालयातील घटनेचा अहवाल प्राप्त झाला असून सदर प्रकारण गंभीर स्वरूपाचे आहे. डॉक्टरांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात शुभांगीच्या आकस्मीत मृत्यूची नोंद केली आहे. ससून रूग्णालयाकडून वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर विश्रांतवाडी पोलीस पुढील कारवाई करणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविकिरण दरोडे यांनी सांगितले. 

 

Tags : Yerawada, Yerawada news, pregnant woman, treatment, Death,