होमपेज › Pune › हद्दीच्या वादामुळे मृतदेह तासभर रस्त्यावर

हद्दीच्या वादामुळे मृतदेह तासभर रस्त्यावर

Published On: Dec 18 2017 2:41AM | Last Updated: Dec 18 2017 1:07AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

ट्रकच्या चाकाखाली सापडून मृत्यू झालेल्या वृद्धाचा मृतदेह पोलिसांच्या हद्दीच्या वादामुळे एक तास रस्त्यावर पडून होता. हा अपघात रविवारी (दि.17) सकाळी 11.30 च्या सुमारास लांडेवाडी, भोसरी येथे घडला. 

मुरलीधर हरिशचंद्र कांबळे (वय 60, रा. पिंपळेगुरव) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर ट्रकचालक फरार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुरलीधर त्यांच्या मुलासबोत लांडेवाडी येथील दुकानातून तांदळाचे पोते घेऊन दुचाकीवरून घराकडे निघाले होते. टी जंक्शनजवळ त्यांच्या मांडीवर असणारे तांदळाचे पोते खाली पडले. त्यामुळे कांबळे हे पोते घेण्यासाठी खाली उतरले. त्यावेळी समोरून आलेल्या ट्रकची धडक बसली. ट्रकचे मागचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. मात्र एक वाजेपर्यंत पोलिस आणि रुग्णवाहिका न येऊ शकल्याने मृतदेह रस्त्यावरच पडून होता. वारंवार फोन केल्यानंतर अखेर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी आले. खासगी रुग्णवाहिका बोलावून मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास पोलिस करत आहेत.