Thu, Jun 27, 2019 18:12होमपेज › Pune › दौंड-पुणे-दौंड विद्युत लोकल स्वप्नच राहणार

दौंड-पुणे-दौंड विद्युत लोकल स्वप्नच राहणार

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 06 2018 12:45AMदौंड : उमेश कुलकर्णी

दौंड-पुणे-दौंड विद्युत लोकल हे केवळ दौंडकरांचे स्वप्नच राहणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. जिल्ह्याचे नेतृत्व करणारे बारामतीकर नेते व रेल्वे प्रशासनाने मात्र डेमूचाच पाढा चालू ठेवला आणि त्याला दौंडकर नेत्यांनीही विरोध न करता ‘हा’ला ‘हो’ म्हणत गेले. त्यातच बारामतीकर व रेल्वे प्रशासन यांनी दौंड-पुणे या मार्गावरील मांजरी, कडेठाण, खुटबाव व हडपसर या रेल्वेस्थानकांची उंची कमी असल्याचे कारण सांगत वेळ मारून नेली; परंतु जनता एवढी दूधखुळी नसून या गोष्टीला दीड वर्ष पूर्ण झाले, तरी खुटबाव व हडपसर वगळता इतर रेल्वेस्थानकांची उंची वाढविण्याचे काम जोर रेल्वे प्रशासनाच्या अधिकार्‍यांच्या मनमानी कारभार व अपुर्‍या निधीअभावी अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यांना बारामतीकर कामाला लावण्यात अयशस्वी ठरले आहेत

दौंड-पुणे लोकल सुरू होण्याकरिता खा. सुप्रिया सुळे यांनी अनेकदा रेल्वे प्रशासनाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठका घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावण्याचा केविलवाणा व असफल प्रयत्न केला. ही विद्युत लोेकल डिसेंबर 2017 अखेर सुरू करण्याचे आश्‍वासन काही रेल्वे अधिकार्‍यांनी खासदारांना  दिले होते, परंतु हे आश्‍वासनदेखील हवेतच विरले. आता बारामती-दौंड असे विद्युतीकरणाचे काम सुरू असून, हे काम पूर्ण झाल्यानंतरच पुणे-बारामती विद्युत लोकल सुरू होणार असल्याचे प्रवाशांमध्ये बोलले जात आहे. दौंड-पुणे विद्युत लोकलवरून अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या सोईनुसार एकमेकांवर तोंडसुख घेतले, मात्र ठोस अशी भूमिका कोणीच घेतली नाही. यावरून दौंडच्या राजकीय नेत्यांना शहराच्या विकासाविषयी किती आत्मियता, आस्था आहे, हे दिसून येते.

रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये विद्युत लोकलसाठी साडेसात कोटींच्या निधीची तरतूद केली असल्याचे जाहीर केले होते, परंतु या निधीपैकी काही निधी प्राप्त झाला असून, उर्वरित निधी येणे बाकी आहे. 25 मार्च 2017 रोजी विद्युत लोकलच्या नावाखाली डिझेल मल्टिपल युनिट (डेमू) मोठ्या थाटामाटात व गाजावाजा करत प्रवाशांच्या सेवेकरिता चालू करण्यात आले व दौंडकरांच्या तोंडाला राजकीय नेत्यांनी पद्धतशीर पाने पुसली.  दौंड-पुणे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर ही डेमू लोकल सुरू करण्यामागे रेल्वे प्रशासन व राजकीय नेत्यांचा दौंडकरांना मुर्खात काढण्याचा प्रयोग, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जर डेमूच सुरू करावयाची होती, तर ती विद्युतीकरणापूर्वीच का सुरू करण्यात आली नाही? असा प्रश्‍न दौंडकरांनी केला आहे. डेमू सुरू झाल्यापासून अनेक वेळा आग लागणे, काही वेळा गाडीतून धूर निघणे, डिझेल युनिट मध्येच बंद पडणे, त्यावेळी तिला दुसर्‍या डिझेल इंजिनद्वारे ओढून आणणे, दुरुस्तीच्या नावाखाली एखाद्या दिवशी डेमूच न सोडणे, असे अनेक प्रकार वारंवार घडलेले असताना आणि या डेमूऐवजी पूर्वीचीच शटल रेल्वे सेवा पूर्ववत चालू करण्याची मागणी करूनही पूर्वीची शटल सेवा चालू केली नाही.