Tue, Jul 23, 2019 06:24होमपेज › Pune › निस्सारचा मृतदेह स्वीकारण्यास नकार

निस्सारचा मृतदेह स्वीकारण्यास नकार

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:38AMदौंड : प्रतिनिधी 

आत्महत्या केलेले दौंड शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते निस्सार जब्बार शेख (वय 45) यांचा मृतदेह दफन विधीसाठी स्वीकारण्यास शनिवारी (दि.3) पुन्हा त्यांच्या नातेवाईकांनी नकार दिला. 
शेख यांनी दौंडमधील मदरसा व मस्जीद या दोन धर्मस्थळांची माहिती माहिती अधिकारात मागविल्याने काही व्यक्‍तींनी त्यांना प्रचंड त्रास दिल्याने त्यांनी गुरुवारी (दि. 1) राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने आत्महत्या कोणाच्या त्रासाला कंटाळून करीत आहे, अशा अकरा लोकांची नावे घेऊन मृत्यूपूर्वी एक व्हिडिओमधून आपल्या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पोलिस निरिक्षक भगवान निंबाळकर व पोलिस अधीक्षक यांना पाठविला. तसेच आपल्या जवळच्या काही मित्रांनादेखील हा व्हिडिओ पाठविला.

आपल्या मृत्यूनंतर या सर्वांना अटक होऊन त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत नातेवाईकांनी आपला मृतदेह ताब्यात घेऊ नये आणि त्याच्यावर दफनविधीही करू नये, हीच आपली शेवटची इच्छा आहे, असेही शेख यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलेले आहे. त्याचबरोबर याच आशयाची चिठ्ठीही त्यांनी लिहिलेली आहे.  निस्सार शेख यांनी आपल्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे दिली आहेत : हाजी ताहिर खान, हाजी युनूस खान, हाजी सोहेल खान, हाजी शफी उल्लाखान, फिरोज शफी उल्लाखान, मौलाना अब्दुल रज्जाक, इस्माईल इब्राहिम शेख, वसीम इस्माईल शेख, शेख दस्तगीर हाजी कादर शेख, उबेद बाबुमियाँ खान, अकलाक रहिम खान, तजमुल काजी  यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही, तोपर्यंत माझ्या देहाचे दफन करण्यात येऊ नये, असे आपल्या व्हिडिओ क्लिप व चिठ्ठीमध्ये म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यातून घेण्यास स्पष्ट नकार दिला.

त्यामुळे पोलिसांची मोठी पंचायत झाली. पोलिसांनी शुक्रवारी (दि. 2) रात्री उशिरापर्यंत त्यांच्या पत्नीची व कुटुंबीयांची बराच वेळ समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु नातेवाईक आपल्या निर्णयावर ठाम होते. अखरे पोलिसांनी रात्री दीडच्या सुमारास निस्सार जब्बार शेख यांचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयाच्या शवागृहात पाठविला. शनिवारी (दि. 3) पुन्हा सकाळी निस्सार शेख यांच्या नातेवाईकांनी आरोपींना जोपर्यंत अटक करीत नाहीत, तोपर्यंत आम्ही पोलिस ठाण्याबाहेर बसून राहणार, अशी भूमिका घेतल्याने वातावरण बराच काळ तणावपूर्ण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा अध्यक्ष सोहल खान व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक वसीम शेख यांचेवर या  प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने दौंड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भात खा.

सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  पोलिसांना सूचना केल्या  यासंदर्भात आमदार राहुल कुल म्हणाले की, मी पोलिस यंत्रणेला योग्य त्या कारवाईच्या सूचना केल्या आहेत.तर या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेंसचे जिल्हा अध्यक्ष जालिंदर कामठे यांना विचारले असता, ते म्हणाले की, मी या घटनेची सविस्तर माहिती घेऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून पुढील निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. 

दोषींवर कारवाई  व्हावी : थोरात

माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की, या घटनेची सी.आय.डी. चौकशी व्हावी, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, विनाकारण या घटनेचे जर कोणी राजकारण करून चुकीचा संदेश लोकांमध्ये पसरवित असेल तर त्यांच्यावरदेखील कारवाई करावी. पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता नि:पक्षपातीपणे चौकशी करून कारवाई करावी.