होमपेज › Pune › दौंडकरांसाठी विद्युत लोकल सुरू होणारच नाही 

दौंडकरांसाठी विद्युत लोकल सुरू होणारच नाही 

Published On: Mar 23 2018 2:04AM | Last Updated: Mar 23 2018 2:00AMपुणे : निमिष गोखले

पुणे-दौंड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण हे रेल्वेच्या सोयीसाठी झालेले आहे. पुणे-दौंड रेल्वे मार्गावर विद्युत लोकल सुरू करण्यासाठी ते झालेलेच नाही. त्यामुळे यादरम्यान विद्युत लोकल कधी सुरू होईल, हे सांगता येणार नाही, असे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले असून, विद्युतीकरणानंतर लोकलकडे डोळे लावून बसलेल्या पुणे-दौंड दरम्यानच्या प्रवाशांचे लोकलमधून प्रवास करणे अद्यापही दिवास्वप्नच दिसत आहे. 

राजकीय अनास्था, रेल्वे प्रशासनाचा उदासीन कारभार, आदी कारणांमुळे पुणे ते दौंडदरम्यान लोकल लालफितीत अडकली आहे. रेल्वेचा पुणे विभाग मात्र जबाबदारी झटकत रेल्वे बोर्डाकडे बोट दाखवत आहे. राज्य सरकारने पुणे-दौंड हा पट्टा उपनगरीय घोषित न केल्यामुळे लोकल अद्यापही सुरू झाली नसल्याचे उत्तर रेल्वेच्या एका अधिकार्‍याने खासगीत दिले आहे. यामुळे एकंदरीतच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच प्रशासन धन्यता मानत असल्याचे दिसते. यामुळे प्रवाशांचे मात्र पुरते हाल होत आहेत. ‘विद्युतीकरण पूर्ण झाले म्हणजे विद्युत लोकल सुरू होईलच असे नाही. मनमाडमार्गे पुण्यात येणार्‍या गाड्यांचे विजेचे इंजिन बदलावे लागू नये म्हणून दौंड-पुणे विद्युतीकरण करण्यात आले’, असे धक्कादायक उत्तर रेल्वेच्या एका अधिकार्‍याने खासगीत दिले आहे.

त्यामुळे पुणे-दौंड लोकल केव्हा सुरू होणार हा प्रश्‍न मात्र अनुत्तरितच राहिला आहे. 2006 मध्ये पुणे-दौंड विद्युतीकरणासाठीचा प्रस्ताव तब्बल चौदा वर्षांच्या वनवासानंतर मंजूर करण्यात आला. कारण मुंबई-चेन्नई हा मार्ग सुवर्ण चतुष्कोनच्या अंतर्गत येत असल्याने या मार्गावर सुविधा पुरवणे हे क्रमप्राप्तच होते. परंतु यासाठी आवश्यक निधी मात्र उपलब्ध होत नव्हता, म्हणून पुन्हा एकदा हा प्रकल्प रखडला. 
अखेर एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज मंजूर झाले व या मार्गावरील मोठा अडसर दूर झाला. सप्टेंबर 2016 मध्ये तब्बल दहा वर्षांनंतर या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वास आले. 

विद्युतीकरणानंतर स्थानिक प्रवाशांना आशा होती की येथून पुढे तरी विजेवरील लोकल (ईमू) धावेल. मात्र त्यांची आशा फोल ठरली असून, विद्युतीकरण पूर्ण होऊन पावणेदोन वर्षे उलटली तरीही ईमू (इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) लोकल सुरू झालीच नाही. रेल्वेच्या सुरक्षा विभागाने या मार्गावर सध्या ईमू लोकल धावू शकणार नाही, असे सांगितल्याची माहितीही समोर आली आहे. 

मागील वर्षी 25 मार्च रोजी डिझेलवर चालणारी डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) प्रवाशांच्या माथी मारण्यात आली. कडेठाण, मांजरी, खुटबाव येथील प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने डेमू सुरू करण्यात आल्याचे उत्तर त्यावेळी देण्यात आले. 

डेमूला जिने असल्याने प्रवाशांना चढ-उतार करणे सोपे होईल, म्हणून डेमू सुरू करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. मात्र पॅसेंजरच्या जागेवर डेमू सुरू केल्यामुळे फक्त रेल्वे बदलल्याचा आनंद झाला, परंतु समस्या कायम राहिल्या. त्यामुळे डेमूची अवस्था असून अडचण, नसून खोळंबा अशी झाली. 

कमी प्रवासी संख्येचे कारण 

पुणे-दौंड-पुणेदरम्यान रोज 21 हजार प्रवासी प्रवास करत असल्याची आकडेवारी रेल्वेच्या वतीने देण्यात आली. पुणे-लोणावळा-पुणेदरम्यान दररोज सुमारे सव्वा लाख प्रवासी प्रवास करतात. त्या तुलनेत 21 हजार हा आकडा कमी असून, लोकल सुरू करण्याची गरजच काय, असा अजब सवाल रेल्वे प्रशासनाने उपस्थित केला आहे. पुणे-दौंड लोहमार्ग 72 किलोमीटरचा असून सद्यःस्थितीत कडेठाण, मांजरी, खुटबाव स्थानकांच्या प्लॅटफॉर्मच्या उंचीचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर विद्युत लोकल सुरू करू, असे आश्‍वासन मागील वर्षी प्रवाशांना देण्यात आले होते. 

एप्रिल अखेरपर्यंत तिन्ही स्थानकांचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे; लोकल मात्र सुरू होणार नसल्याचीच चिन्हे दिसत आहेत. यामुळे या मार्गावर अप-डाऊन करणारे हजारो चाकरमानी, विद्यार्थी यांचे हाल सुरूच राहणार आहेत. गेंड्याची कातडी असणार्‍या प्रशासनाला आमची समस्या काय कळणार, असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.

 

Tags : pune, pune news, Daund, Electric Local,