Sat, Jul 20, 2019 23:38होमपेज › Pune › पुणेः गोळीबाराने दौंड हादरले, तिघांचा मृत्‍यू

पुणेः गोळीबाराने दौंड हादरले, तिघांचा मृत्‍यू

Published On: Jan 16 2018 4:18PM | Last Updated: Jan 16 2018 6:40PM

बुकमार्क करा
दौंड : वार्ताहर 

राज्य राखीव पोलीस दलातील संजय बळीराम शिंदे या जवानाने दौंड शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांना गोळ्या घातल्याची घटना घडली आहे. यात तिघांचाही मृत्‍यू झाला. या घटनेमुळे दौंडमध्ये खळबळ माजली आहे. 

संजय शिंदे याने दोन व्यक्‍तींवर अहमदनगर रोडवरील चौकात मोजणी कार्यालयाच्या वळणावर गोळ्या घातल्या. यामध्ये गोपाल काळुराम शिंदे (वय ३२), परशुराम गुरूनाथ पवार (वय ३०, दोघे रा. वडार गल्ली दौंड)  हे दोघेही जागीच ठार झाले. परशुराम पवार, गोपाळ शिंदे दोन्ही नातेवाईक आहेत. तिसरी व्यक्‍ती अनिल जाधव याला जिजामाता नगर कुरुकुंभ रोडवरील इच्छा पुर्ती या राहत्‍या बंगल्याच्या गेट समोरच गोळ्या घातल्या. यात त्‍यांचा मृत्‍यू झाला.

गोळीबार करणारा संजय शिंदे हा त्याच्या राहत्या घरात गोपाळवाडी रोड वरती असणाऱ्या अथर्व हाइट्स येथे लपला होता. या ठिकाणी तो कुटुंबासह राहतो. ही माहिती मिळताच या ईमारतीच्या बाहेर पोलिस बंदोबस्‍त वाढवण्यात आला होता. या ठिकाणी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. या दरम्‍यान, पोलिसांनी राज्य राखीव पोलीस दलाची कुमक मागवली होती. त्याच्याकडे पिस्तुल असल्यामुळे पोलिस त्याला बाहेर येण्याचे आवाहन करत होते. तो बाहेर येत नसल्यामुळे काही वेळ पोलिसांनी घराला वेढा टाकला होता. पोलिसांच्या आवाहनानंतर काही वेळाने संजय बाहेर आला. त्‍याला पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. त्याने पैशाच्या वादातून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी दौंड पोलिस अधिक तपास करत आहेत. सध्या दौंड शहरात आणि संपूर्ण तालुक्यात या घटनेची चर्चा सुरु आहे.