Thu, Apr 25, 2019 23:25होमपेज › Pune › दत्तात्रय शिंदे यांच्या कुटुंबाला सावरणे गरजेचे

दत्तात्रय शिंदे यांच्या कुटुंबाला सावरणे गरजेचे

Published On: Aug 05 2018 1:31AM | Last Updated: Aug 05 2018 12:54AMवाल्हे : वार्ताहर 

सकल मराठा समाजला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावचे दत्तात्रय शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 3) आत्महत्या करून जीवन संपवले. त्यांच्या कुटुंबाला शासनाने तातडीने मदत देऊन त्या कुटुंबातील दोन व्यक्तींना शासकीय सेवेत रुजू करावे, अशी मागणी  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रकाश शिंदे यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, शासकीय दरबार हा हेलपाटे मारविणारा असतो. त्याप्रमाणे या कुटुंबाला कोणतेही हेलपाटे मारायला न लावता मदत मिळणे गरजेचे आहे. सध्या दत्तात्रय शिंदे यांची पत्नी गर्भवती आहे. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीत शासनाने शिंदे यांच्या मुलांचे भवितव्य लक्षात घेऊन तत्काळ मदत करणे गरजेचे आहे.

मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रशांत वांडेकर यांनी सांगितले की, दत्तात्रय शिंदे यांनी समाजाच्या भविष्याचा विचार करून बलिदान केले आहे. समाजाच्या वतीनेही तत्काळ मदत दिली जाणार आहे.पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चा समन्वयक प्रशांत पाटणे यांनी सांगितले की, झालेली घटना ही मन सुन्न करणारी आहे. मराठा युवकांनी जीवाशी अजिबात खेळू नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा पुरंदरच्या वतीने करण्यात येत आहे.

दत्तात्रय शिंदे यांनी समाजासाठी आपले जीवन संपविले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, आई व लहान मुलगा असा परिवार आहे. उदरनिर्वाहचे साधन केवळ शिंदे हेच होते. त्यामुळे शासनाने प्रतिव्यक्तींचा विचार करून त्यांच्या भविष्याचा विचार करून जास्तीत जास्त मदत करणे गरजेचे आहे. जेजुरी देवस्थान कमिटीचे सदस्य व मराठा क्रांती मोर्चा समन्वयक संदीप जगताप यांनी सांगितले की, दत्तात्रय शिंदे  यांच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत द्यावी व कुटुंबातील पत्नीला प्राधान्य देऊन कायमस्वरूपी शासकीय नोकरी द्यावी. 

शिंदे कुटुंबाचा उघड्यावर आला संसार

वाल्हे : वार्ताहर 

दत्तात्रय शिंदे यांचे वडील हे महावितरण कंपनीत वायरमन होते. त्यांच्या प्रामाणिकपणा हा वाखाणण्याजोगा असल्याने पगारातच मिळेल त्यावर भागवणे अशी शिस्तच होती. अल्पशेती तीही नापिकी, घर नाही अशातही समाजसेवा करणारा दत्तात्रय शिंदे निवृत्तीनंतर मिळालेल्या रक्कमेत छोटीशी सदनिका घेऊन सासवड येथे राहत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व जबाबदारी दत्तात्रय शिंदेवरच होती. तेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बळी गेल्याने त्यांच्या पत्नी आश्विनी शिंदे यांनी ‘असं कसं निर्दयी सरकार आहे, मर्‍हाट्यांच्या पोरांचा बळी घेतंय, अन् अजून किती बळी घेतल्यावर सरकारला जाग येणार’ असा संताप व्यक्त केला आहे.  प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची माझ्याप्रमाणे वाताहत होईल असे काही करू नका, अशी भावनिक साद दत्तात्रय शिंदे यांच्या पत्नी अश्‍विनी शिंदे यांनी मराठा तरुणांना घातली.