Tue, Mar 26, 2019 01:39होमपेज › Pune › राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी दत्ता साने

राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी दत्ता साने

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 09 2018 1:46AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची निवड झाली आहे. त्या संदर्भातील पत्र मंगळवारी (दि. 8) पुणे विभागीय कार्यालयास सादर करण्यात आले. लवकरच त्याच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिक्‍कामोर्तब होणार आहे. 

वर्षभराचा कार्यकाळ संपल्याने विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी शनिवारी (दि.5) आपल्या पदाचा राजीनामा महापौर नितीन काळजे यांच्याकडे सादर केला होता. सदर पद रिक्त झाल्याने पक्षाने 36 नगरसेवकांचा गटनेतेपदी दत्ता साने यांची निवड केली आहे. त्यास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयाकडे अर्ज सादर करण्यात आला असून, तशी नोंदणी करण्यात आली आहे.त्या संदर्भात विभागीय आयुक्ताचे पत्र 2 ते 3 दिवसांमध्ये पालिकेस मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर महापौर काळजे हे विरोधी पक्षनेते म्हणून साने यांची घोषणा करतील. 

पालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 36 नगरसेवक निवडून आले. पालिकेतील सत्ता गेल्यानंतर पाहिल्यांदाच विरोधी बाकावर राष्ट्रवादी आली आहे. सत्ताधारी भाजपने स्थायी समितीचे पद प्रत्येकी एका वर्षाचे केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसनेनेही विरोधीपक्ष नेतेपद एक वर्षांसाठी देण्याचे नवे धोरण ठरविले. त्यानुसार पक्ष आदेश मानून बहल यांनी राजीनामा दिला. त्याच्या जागी साने यांची निवड झाली आहे.  साने हे पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. ते तिसर्‍यांदा चिखली परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. सत्ताधारी भाजपला कडवा प्रतिकार करण्यासाठीच त्यांची निवड केल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची गणिते डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली असल्याची चर्चा आहे. महापौरापाठोपाठ विरोधी पक्षनेतेपदही समाविष्ट गावातील प्रतिनिधीत्व करणार्‍या नगरसेवकास देण्यात आल्याने त्या परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.