Fri, Jul 19, 2019 17:45होमपेज › Pune › आरोपींना पकडणे हे नाटक

आरोपींना पकडणे हे नाटक

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 21 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

आपल्या देशातील हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थच गेले आहे. ज्या उद्देशाने त्यांनी बलिदान दिले त्या उद्देशाशी लोकांनी, देशातील तरुणांनी गद्दारी केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांच्या दुष्कृत्याचे डाग आपल्या अंगावर उडू नये याची काळजी आपल्या नेत्यांनी घेतली. या चार वर्षात हे डाग काढण्याचे काम केले गेले. त्यानंतर या दोन मारेकर्‍यांना पकडून त्यांच्या अटकेचे नाटक केले गेेले, अशी परखड टीका महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त ‘जवाब दो’ कार्यक्रमातंर्गत चर्चासत्रात ‘व्यर्थ न हो बलिदान’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर, गोविंद पानसरेंच्या स्नुषा मेघा पानसरे, मुक्ता दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष अशोक दिवरे उपस्थित होते.

तुषार गांधी म्हणाले, मारेकर्‍यांना अटक झाली, आता पेशी होईल आणि पुराव्याअभावी सोडण्यात येईल. अशा लोकांना न्यायालय शिक्षा देऊ शकणार नाही. त्यांना लोकांनी शिक्षा द्यायला हवी. विचारांचा पराभव हा विचारांनीच होतो, बंदुकीच्या गोळ्यांनी नाही. ज्यांना विचारांनी लढता येत नाही त्यांना गोळ्यांचा आधार घ्यावा लागतो. ही खुनी संस्कृती आहे. असे विचार करणारे लोकांना मारत राहतील. त्यांच्याविरोधात आपण राग मनात ठेवायला हवा. राग न ठेवल्यास आपण त्यांचा प्रतिकार करू शकणार नाही. राग यायला हवा. मात्र, अनावर व्हायला नको. मारेकरी पकडले असले तरी आपण कधीच संतुष्ट व्हायला नको. ज्या विचारांनी ही हत्या केली त्याच विचारांच्या लोकांचे सरकार राज्यात आणि देशात आहे. या देशाची-प्रदेशाची आपण जबाबदारी घ्यायला हवी आणि विचारांनी लढायला हवे.

अमोल पालेकर म्हणाले, सत्तेवर कुठलेही राजकीय पक्ष असले तरी त्या राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन एका विचार प्रणालीवर, विचार स्वातंत्र्यावर सातत्याने होणारे हे हल्ले आपल्याला कसे थांबवता येतील, याचा आपण विचार करायला हवा. विचार स्वातंत्र्याबद्दल व्यवस्थेला काही प्रश्‍न विचारल्यास ‘त्याची मुस्कटदाबी होणार आहे का, विचार स्वातंत्र्य मागण्यासाठी म्हणून जर काही चळवळी उभ्या राहिल्या, जर काही प्रश्‍न उपस्थित केले तर त्याकडे देशद्रोह म्हणून बघितले जाणार आहे का’ हे सगळे मुद्दे फार महत्त्वाचे असून ते एका माणसाचे, एका कलावंताचे, एका गटाचे असू शकत नाही, ते तुमचे, आमचे सर्वांचे आहेत. प्रत्येक विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचावा, तो मधल्यामध्ये दडपला जाऊ नये. त्याच्यावर हल्ले न होणे यासाठी विचार स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. 

मेघा पानसरे म्हणाल्या, आपण विचारावरून कृतिशीलतेवर उतरलो नाही तर संकटाचा सामना करावा लागणार आहे. सामाजिक सुधारणा आणि धर्म अशा वळणावर संघर्ष आला आहे. राजकीय लढ्यासाठी लोकांना तयार करण्याचे काम या मारेकर्‍यांची संघटना करते. आपण अंधश्रद्धा, दैववाद हा दूर केला नाही तर राजकीय आंदोलनामध्ये हे लोक सहभागी होऊ शकणार नाही. त्यांचे धोरण थेट बोलण्याचे, खोटे बोलण्याचे, गैरसमज पसरविण्याचे धमकी देण्याचे आहे.

मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्याला अटक करण्यात आलेली आहे. मात्र, तेवढे पुरेसे नाही. कटाचा उलगडा होऊन सूत्रधारांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्याचबरोबर निर्भयपणे विचार मांडण्याची संधी मिळाली पाहिजे.  त्यामुळे जवाब दो आंदोलन यापुढेही सुरूच ठेवले जाणार आहे. ‘दुर्जन माणसांचा नाश करा’ असे जाहीरपणे बोलणार्‍यांवर शासन काय कारवाई करणार आहे? संघर्षाशिवाय आपल्या समाजात आता रचनात्मक काम करता येणार नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष अरुण बुरांडे यांनी केले.