Tue, Jul 16, 2019 23:54होमपेज › Pune › दापोडीतील भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर

दापोडीतील भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर

Published On: May 18 2018 1:32AM | Last Updated: May 18 2018 12:57AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींग (सीएमई) प्रवेशद्वारासमोर भुयारी मार्ग (सब-वे) तयार  करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हा मार्ग येत्या चार महिन्यात खुला करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे हलक्या व अवजड वाहनांना या मार्गातून दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावर वळण घेणे आणि ग्रेडसेपरेटर मार्गावरील वाहनांना विनासिग्नल ये-जा करता येणार आहे.  

दापोडीत ग्रेडसेपरेटर मार्ग ओलांडण्यासाठी सोयच नसल्याने अनेक अपघात होत आहेत. त्यात अनेक जणांचा मृत्यू तर काही जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी पादचारी पुल उभारण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, सीएमईसमोर भुयारी मार्ग बांधण्याचा विचार पुढे आल्याने पादचार्‍यांसह वाहनांना वळण घेणे सुरक्षित होणार असल्याने पादचारी पुलाचा नियोजन रद्द करण्यात आले. सीएमई प्रवेशद्वारासमोर या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. भुयारी मार्गाचे दोन्ही बाजूचे भिंती उभी राहिली असून, त्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. या मार्गावरच पुणे मेट्रोचे पिलर उभारणीचे काम सुरू आहे. पालिका व मेट्रोने समन्वय साधत हे काम केल्याने वाहतुकीस फारसा अडथळा निर्माण न होता काम वेगात होत आहे. या मार्गातून दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहने ये-जा करून शकणार आहे. सीएमईमध्ये येणारी लष्कराची शक्तिमान व इतर अवजड वाहने ये-जा करून शकतील यासाठीच या मार्गाची उंची 7.5 मीटर इतकी अधिक ठेवण्यात आली आहे. यामुळे ग्रेडसेपरेटर मार्गावरील वाहनांना विनासिग्नल ये-जा करता येणार आहे. परिणामी, या चौकातील सिग्नल काढून टाकला जाईल. 

सीएमईमुळे भुयारी मार्गास लष्कराचा ‘लुक’-

सीएमई प्रवेशद्वारासमोर हा भुयारी मार्ग विकसित केला जात आहे. त्यामुळे या भुयारी मार्गास व रॅम्पला भारतीय लष्कराच्या रंगसगतीप्रमाणे सजावट केली जाणार आहे. मार्गाच्या भिंतीवर लष्करी जवान, शस्त्रास्त्रे, रणगाडे आदीचे चित्रे असणार आहे. त्यामुळे हा भुयारी मार्ग ग्रेडसेपरेटरमधील वेगळा मार्ग ठरणार आहे. 

असा आहे भुयारी मार्गाचा खर्च-

या भुयारी मार्गाचा खर्च 8 कोटी 79 लाख 73 हजार रूपये आहे. बांधकाम कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि. कंपनी करीत आहे. कामाचा वर्कऑर्डर 11 जानेवारी 2017ला देण्यात आली आहे. त्याचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. बोेपोडीच्या बाजूने 123.70 मीटर लांबीचा रॅम्प असणार आहे. तर, फुगेवाडीच्या बाजूने 233.70 मीटर लांबीचा रॅम्प तयार केला जाणार आहे. कामाची मुदत 10 महिने आहे. मात्र, पुणे मेट्रोच्या कामामुळे प्रत्यक्ष कामास गेल्या वर्षी दिवाळीनंतर सुरूवात करण्यात आली. त्यास मुदतवाढ देण्यात आली असून, 30 सप्टेंबर 2018पर्यंत हा मार्ग वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन आहे.