Fri, Apr 26, 2019 15:17होमपेज › Pune › कोणत्याही स्थितीत दापोडी-निगडी बीआरटी सेवा सुरू करणारच

कोणत्याही स्थितीत दापोडी-निगडी बीआरटी सेवा सुरू करणारच

Published On: Jan 11 2018 1:28AM | Last Updated: Jan 11 2018 12:17AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेने दापोडी-निगडी बीआरटीएस मार्ग सुरू करण्यासाठी आयआयटी पवईच्या सुचनांनुसार सुरक्षा उपायोजना केल्या आहेत. सर्व कामे झाल्यानंतर उच्च न्यायालयाची मान्यता घेऊन हा मार्ग कार्यान्वित केला जाईल, असा ठाम विश्‍वास महापौर नितीन काळजे यांनी बुधवारी (दि.10) व्यक्त केला. 

दापोडी-निगडी या 12.50 किलोमीटर अंतर मार्गावर दुहेरी पद्धतीने बीआरटीएस मार्ग विकसित केला आहे. या मार्गाची महापौर काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर व अधिकार्‍यांनी चाचणी घेतली आहे. हा मार्ग सुरू करण्यावरून भाजपाच्या सत्ताधार्‍यांमध्येच वाद-प्रतिवाद सुरू आहे.  या संदर्भात विचारले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

महापौर काळजे म्हणाले की, आयआयटीने दिलेल्या अहवालानुसार बीआरटी मार्गावरील वाहतुक सुरक्षा उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याप्रमाणे मार्गावर सुरक्षाबाबत काळजी घेतली जात आहे. त्यांची संपूर्ण कार्यवाही झाल्यानंतर उच्च न्यायालयाची मान्यता घेऊन त्वरीत बीआरटीएस सेवा सुरू केली जाईल. बीआरटी सेवेमुळे शहरातील नागरिकांना जलद बस सेवा मिळणार आहे. परिणामी, शहरातील वाहतुक कोंडी सुटण्यास मदत मिळणार आहे. तसेच, वायु व ध्वनी प्रदूषणात घट होणार आहे. 

वाढत्या शहरासाठी बीआरटीएस सार्वजनिक वाहतुक व्यवस्था ही आवश्यक गरज आहे. त्या दृष्टीने महापालिका कारवाई करीत आहे. दापोडी-निगडी बीआरटीएस मार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरू केला जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.