होमपेज › Pune › दापोडी-निगडी ‘बीआरटीएस’चे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर

दापोडी-निगडी ‘बीआरटीएस’चे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 06 2018 12:38AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी ते निगडी बीआरटीएस मार्ग तयार करून 10 वर्षे रखडला आहे. या मार्गावरील सर्व सुरक्षा उपाययोजना पूर्ण केल्याचा दावा पालिकेने केला आहे. केवळ मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा असून, त्यानंतरच मार्ग सुरू करण्याचा फैसला होणार आहे.

पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील दापोडी-निगडी हा साडेबारा किलोमीटरचा दुहेरी बीआरटी मार्ग आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो रखडला आहे. त्यावर आतापर्यंत पालिकेने कोट्यवधी रूपये खर्च केले आहे. या ग्रेडसेपरेटर मार्गावर वाहनचालकांच्या सुरक्षा उपायाकडे दुर्लक्ष केले गेले असल्याने शहरातील एका नागरिकाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सुरक्षा उपाययोजनासाठी पालिकेने आयआयटी पवईच्या तज्ज्ञाच्या पथकाकडून मार्गाची पाहणी करून घेतली. पथकाने अहवाल देत सुरक्षेसंदर्भात काही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. मार्गावर नावफलक लावले आहेत. पादचारी पुलावरून बीआरटी मार्गावर नागरिकांना ये- जा करण्यासाठी स्टेनलेस स्टिलचे खांब (बोलॉर्ड) बसविले आहेत. पुलावरून थेट नागरिक बीआरटी मार्गावर येऊ नये म्हणून बीआरटीच्या दोन्ही बाजूस हे खांब लावले आहेत. असे पादचारी पुल पिंपरी-चिंचवड पालिका भवन व चिंचवड स्टेशन येथे आहे. 

चौक सोडून इतर ठिकाणी नागरिकांना ये-जा करण्यासाठी सिग्नल यंत्रणा सुरू व बंद करण्याची नवी यंत्रणा लावली आहे. त्यासाठी सिग्नल खांबावर लाल रंगाचे बटन लावले आहे. ते दाबून नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येणार आहे. आयआयटीच्या सूचनाशिवाय पालिकेने दक्षता म्हणून काही सुरक्षा उपाय केले आहेत, असे पालिकेच्य ा अधिकार्‍यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाची सुनावणीची तारीख अद्याप निश्‍चित झालेली नाही. ती तारीख निश्‍चित होऊन सुनावणी झाल्यानंतरच बीआरटी मार्ग तातडीने सुरू केला जाणार आहे. केवळ न्यायालयाच्या सुनावणीच्या प्रतिक्षेसाठी थांबलो असल्याचे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, बीआरटी सुरू झाल्याने सर्व्हिस लेनमधून बस धावणार नाहीत. त्यामुळे सर्व्हिस लेनवरील वाहनांची संख्या कमी होऊन इतर वाहनचालकांना वाहतुक करणे अधिक सुरक्षित व सुलभ होणार असल्याचे अधिकार्‍यांनी दावा केला आहे. 

 

Tags : pune, pune news, Dapodi Nigdi, BRTS,