होमपेज › Pune › दापोडी-निगडी ‘बीआरटी’चा मार्ग बिकट

दापोडी-निगडी ‘बीआरटी’चा मार्ग बिकट

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 08 2018 12:54AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी ते निगडी हा दुहेरी बीआरटीएस मार्ग विकसित केला आहे. मात्र, या मार्गावर महामेट्रोच्या वतीने खोदकाम सुरू असून, अनेक ठिकाणी बॅरिकेट्स तोडफोड करून त्याची नासधूस केली गेली आहे. त्यामुळे हा मार्गाची वाट बिकट झाली आहे. 

दापोडी ते निगडी बीआरटी मार्ग महापालिकेने 2013 पासून विकसित केला आहे. मात्र, या संदर्भात अ‍ॅड. हिम्मतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. ग्रेडसेपरेटर मार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर दोन्ही बाजूने हा मार्ग विकसित केला असल्याने प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेतली नसल्याची जाधव यांची तक्रार आहे. त्यावर अद्याप सुनावणी सुरू असल्याने बीआरटी मार्ग कार्यान्वित झालेला नाही. 

दरम्यान, बीआरटी मार्गावरील अनेक ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स तुटले आहेत. वारंवार वाहने बॅरिकेट्सला धडकून लहान-मोठे अपघात होत आहेत. बसथांब्याची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. काही बस थांब्याचे पत्रे निखळून पडले आहेत. डांबरी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर अनेक टेबल गतिरोधकावर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी 2 टेबल गतीरोधक व 1 गतिरोधक असल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. तसेच, फुगेवाडी, शंकरवाडी, पिंपरी, चिंचवड स्टेशन असा वर्दळीच्या ठिकाणी बीआरटी बॅरिकेटस उभे केले गेलेले नाहीत. त्या ठिकाणी बस ‘नॉन बीआरटी लेन’मधून धावणार आहे.  

महारेल मेट्रो कॉर्पोरेशनने अनेक ठिकाणी बीआरटीचे बॅरिकेट्स काढून टाकले आहेत. तर, पिंपरी चौक, मोरवाडी ते मदर तेरेसा (एम्पायर इस्टेट) पुलापर्यंत, कासारवाडी, नाशिक फाटा येथे बीआरटी मार्गावर मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. कासारवाडी येथील मार्शल कंपनीसमोरील बीआरटीची बॅरिकेटस काढून तेथून रस्ता तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर बीआरटी मार्गातून ग्रेडसेपरेटरमध्ये जाण्यासाठी ‘मर्ज इन’ तयार केला आहे. तर, शंकरवाडीतील पेट्रोल पंपासमोर ग्रेडसेपरेटरमधून बाहेर पडण्यासाठी ‘मर्ज आऊट’ तयार केला आहे. 

असंख्य अडथळ्यामधून तब्बल 25 किलोमीटर अंतराची बीआरटी बस कशी धावणार असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. या बीआरटी लेनमुळे सर्व्हिस मार्ग अरूंद झाला आहे. त्यात मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतुक संथ होऊन कोंडीत भर पडत आहे. गेल्या 6 वर्षांपासून हा मार्ग रखडला असून, तो लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

काम पूर्ण झाल्यानंतर मार्ग पूर्ववत 

मेट्रोची मार्गिका सर्व्हिस लेनच्या बॅरिकेट्सबाहेरून घेतली जाणार आहे. त्यामुळे मेट्रोचे पिलर बॅरिकेट्सच्या बाहेर असतील. बीआरटी बसला अडथळा होणार नाही. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडून बीआरटी मार्ग पूवर्वत करून दिला जाणार आहे. उच्च न्यायालयाकडून ‘हिरवा कंदील’ मिळताच हा मार्ग कार्यान्वित केला जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आयआयटी पवईच्या तज्ज्ञांच्या अहवालानुसार सर्व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.