Fri, Apr 26, 2019 17:22होमपेज › Pune › दापोडी-निगडी बीआरटी मार्गावर अडथळेच अडथळे

दापोडी-निगडी बीआरटी मार्गावर अडथळेच अडथळे

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 22 2018 10:57PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर दापोडी ते निगडी बीआरटीएस मार्गावर अनेक अडथळे आहेत. या अडथळांना ओलांडून या मार्गावर अतिजलद बस सेवा सुरू करण्यासाठी महापालिकेसह पीएमपीएलला कसरत करावी लागणार आहे. 

दापोडी ते निगडी हा एकूण 25 किलोमीटर अंतराचा दुहेरी बीआरटी मार्ग गेल्या 6 वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे हा मार्ग सुरू होणार की नाही, अशी शंका नागरिक व्यक्त करू लागले होते. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच स्थगिती आदेश उठविला आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.24) या मार्गावरून अतिजलद बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी (दि.21) सांगितले.

मात्र, मार्गावर अनेक अडथळे कायम असल्याचे धक्कादायक चित्र आहे. महामेट्रोचे कासारवाडी, नाशिक फाटा, खराळवाडी, पिंपरी चौक, पिंपरी-चिंचवड महापालिका भवन, मोरवाडी, चिंचवडच्या मदर तेरेसा उड्डाणपूल येथे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणच्या बीआरटी मार्गाचे बॅरिकेड्स व कठडे तोडून टाकले असून, तेथे मोठे मोठे खड्डे घेण्यात आले आहेत. परिणामी, या मार्गाचा आणि तेथील बसथांब्यांचा वापर बससाठी करता येणार नाही. या कारणांमुळे अतिजलद बस सेवेला अडथळे निर्माण झाले आहेत. 

मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी खासगी वाहनांप्रमाणे बस सर्व्हिस रस्त्यावरून धावणार असल्याचे पीएमपीएलच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. रस्त्याची सध्याची स्थिती पाहिल्यास ही अतिजलद बस सेवा अडथळ्याची शर्यतच ठरणार असल्याचे बोलले जात आहे. 

काम सुरू असलेल्या ठिकाणी बस सर्व्हिस रस्त्यावरून

दापोडी-निगडी बीआरटी मार्गावर अनेक ठिकाणी पुणे मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथून बस जाऊ शकणार नाही. त्यामुळे तो मार्ग वगळून बस सर्व्हिस रस्त्याने धावेल. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर महामेट्रो बीआरटी मार्ग पूर्ववत करून देणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.