Sat, Apr 20, 2019 15:51होमपेज › Pune › दापोडी हॅरिस समांतर पूल अखेर वाहतुकीस खुला

दापोडी हॅरिस समांतर पूल अखेर वाहतुकीस खुला

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 11:23PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी येथील हॅरिस पुलास समांतर बांधण्यात आलेला पिंपरीहून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या पूल सोमवारी (दि. 2) अखेर वाहतुकीस खुला करण्यात आला. काम पूर्ण झाल्यानंतर तब्बल महिन्याभराच्या विलंबानंतर सत्ताधारी भाजपने पुलाचे उद्घाटन सोमवारी (दि. 2) केले. या पुलाचे काम मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण झाले होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात पूल वाहतुकीस खुला करण्याचे पालिकेचे नियोजन होते. पूल पूर्ण झाल्याचे पत्र 30 मे रोजी पालिकेच्या स्थापत्य विभागाने महापौर नितीन काळजे यांना दिले होते. मात्र, पालकमंत्री गिरीश बापट यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन रखडले होते. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने ईदच्या (दि. 16 जून) मुहूर्तावर सदर पुलाचे अचानक उद्घाटन करून तो वाहतुकीस खुला केला. मात्र,  तातडीने हा मार्ग राडारोडा टाकून बंद करण्यात आला. 

पुलावरून बोपोडी सिग्नल चौकात असलेली बाधित घरे हटविल्यानंतर पूल वाहतुकीस खुला केला जाणार आहे. यासंदर्भात पुणे पालिकेचे सत्तारूढ पक्षनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह पाहणी केल्याचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी स्पष्ट केले होते. अखेर रस्त्यास बाधित घरे न हटविताच या पुलाचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सोमवारी (दि. 2) करण्यात आले. या वेळी उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, ‘ह’ क्षेत्रीय समिती अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, नगरसेविका आशा शेंडगे, स्वाती काटे, पुण्याच्या नगरसेविका अर्चना मुसळे, अतिरिक्‍त आयुक्त दिलीप गावडे आदी उपस्थित होते. 

या पुलाची लांबी 410 मीटर असून, रुंदी 10.50 मीटर आहे. पादचारी मार्ग 1.80 मीटर आहे. पुलावर संरक्षक कठडे, दिशादर्शक फलक व विद्युत दिवे लावण्यात आले आहेत. पुलाचे काम एप्रिल 2016 ला सुरू झाले होते. या पुलामुळे बोपोडी सिग्नल चौकात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. मात्र, बोपोडीतील गांधीनगर झोपडपट्टी हटविण्यास तब्बल दोन वर्षांपेक्षा अधिकचा काळ गेल्याने पुण्याहून पिंपरीच्या दिशेने येणार्‍या पुलाचे काम अर्धवट स्थितीमध्ये आहे. 

उद्घाटनास पालकमंत्री गैरहजर

या पुलाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्याचे पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेचे नियोजन होते. त्यांची तारीख मिळत नसल्याने उद्घाटन करता येत नसल्याचे सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी वेळोवेळी सांगितले होते. पूल तयार होऊन महिना उलटूनही पुलाचे उद्घाटन रखडल्याने सत्ताधार्‍यांना नागरिकांच्या टीकेस सामोरे जावे लागत होते. अखेर पालकमंत्री बापट यांच्या गैरहजेरीत सदर पुलाचे उद्घाटन करण्यात आले.