Sat, Aug 24, 2019 00:20होमपेज › Pune › ‘आरटीई’ प्रवेश न देणार्‍या शाळांना दणका

‘आरटीई’ प्रवेश न देणार्‍या शाळांना दणका

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 12:50AMपुणे : प्रतिनिधी

आरटीईअंतर्गत प्रवेश मिळणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित  ठेवल्यास शाळांना दणका बसणार आहे. आता शाळांची गय केली जाणार नसून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणार्‍या जिल्ह्यातील शाळांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कारणे दाखवा नोटिसा दिल्यानंतर, मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांनी दिला.आरटीईअंतर्गत प्रवेश देण्यासाठी अनेक शाळा टाळाटाळ करतात.  आरटीईची वेगळी तुकडी भरवण्याचे प्रकारदेखील घडले आहेत. त्यामुळे शिक्षणाधिकारी या सर्व प्रकारांना कशाप्रकारे पायबंद घालतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत आरटीईच्या 25 टक्के प्रवेशांतर्गत पहिल्या फेरीसाठी जिल्ह्यातील 933 पात्र शाळांमधून 10 हजार 284 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाचा आदेश असतानाही काही शाळांनी अद्यापही पहिल्या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या रिटपिटीशन 687/2018 चा निर्णय प्राप्त झाला असून शाळांना आरटीई प्रवेश देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे पहिल्या फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित शाळेत जाऊन 11 मे 2018 पर्यंत प्रवेश घ्यावा, असे आवाहन मोरे यांनी केले आहे.