Thu, Jun 27, 2019 10:09होमपेज › Pune › ‘नेव्हिगेटर मॅप’मुळे लक्ष विचलित होऊन अपघातांची शक्यता

‘नेव्हिगेटर मॅप’मुळे लक्ष विचलित होऊन अपघातांची शक्यता

Published On: Aug 05 2018 1:31AM | Last Updated: Aug 05 2018 12:17AMपुणे : नवनाथ शिंदे 

वेळ, इंधन आणि पर्यायाने पैसा वाचविण्यासाठी ‘नेव्हिगेटर मॅप’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रवास सुकर झाला खरा; पण वरील घटनांसारखे अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे यातील धोकेही पुढे आले आहेत. हे धोके  ओळखून या तंत्रज्ञानाचा सावध आणि सुरक्षित वापर होण्याची गरज निर्माण झाली आहे. 

शहराचा विस्तार वाढल्याने आणि वाहतूक कोंडीमुळे इच्छित ठिकाणी जाण्यासाठी गोंधळ उडू नये म्हणून  बहुतांश वाहनांमध्ये चालकासमोरच ‘नेव्हिगेटर मॅप’चा आधार घेतला जात आहे. त्यात व्यावसायिक प्रवासी मोटारांची संख्या अधिक आहे. मात्र, प्रवासी वाहनात बसल्यापासून ते प्रवास पूर्ण होईपर्यंत चालकाचे लक्ष वारंवार मॅपकडे असते, त्यामुळे लक्ष विचलित होते.

परगावातून पुण्यात आलेल्या नवख्या चालकांना शहराची माहिती नसते. अ‍ॅपमध्ये निश्‍चित झालेल्या रस्त्यावरून जाण्यासाठी त्यांचे लक्ष डिटेक्टरवर असते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. 

घटना- 1  

कारमधून डेक्कनहून गुडलक चौकामार्गे रमेश मॅप डिटेक्टरच्या साह्याने रस्ता शोधत निघाला होता. लक्ष मोबाईलमध्ये असल्याने समोर दुचाकीस्वार असल्याचे त्याच्या निदर्शनास आले नाही आणि लक्ष गेल्यावर नियंत्रण सुटल्याने त्याची कार दुचाकीस्वारास धडकली. दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. मात्र, त्यावेळी रमेशची मॅप डिटेक्टरवरील नजर हटली नसती आणि आणखी उशीर झाला असता तर या अपघाताचा परिणाम अधिक गंभीर झाला असता. 

घटना- 2
 

बालेवाडीकडून विद्यापीठाकडे प्रवासी घेऊन आलेल्या वाहनचालकाला रस्ता माहिती नसल्यामुळे त्याचे लक्ष मॅप डिटेक्टरकडे होते. चौकात प्रचंड वाहतूक कोंडी असताना त्याचे लक्ष मॅप डिटेक्टरवरच होते, तेवढ्यात चौकात लाल सिग्नल लागला. मॅप बघायचा, सिग्नल की ब्रेक एकाचवेळी गोंधळ निर्माण झाल्याने नियंत्रण सुटले. गाडी झेब्राक्रॉसच्या पुढे जाऊन अचानक ब्रेक दाबल्याने पुढून ग्रीन सिग्नल मिळाल्याने भरधाव आलेली गाडी थेट या गाडीला येऊन धडकली. 

घटना- 3

केदारला सकाळी उठण्यास उशीर झाला. कंपनीची गाडी निघून गेल्याने त्याने कब बुक केली. उशीर झाल्याने त्याने गाडी वेगाने घेण्यास सांगितले. प्रवासात त्याला झोप लागली. चालक नवखा असल्याने त्याने अ‍ॅपचा आधार घेतला.  रस्ता माहिती नसल्याने तो अ‍ॅपचा आधार घेत निघाला होता. त्याचे लक्ष विचलित झाले. एका चौकात त्याचा गोंधळ उडाला. लक्ष अ‍ॅपकडे असतानाच चौकात दुसरी कार  क्रॉस करत होती. गती कमी न केल्याने दोन्ही वाहनांची धडक झाली.

...यामुळे  अपघात

1. प्रवासादरम्यान वारंवार अ‍ॅपवर लक्ष
2. प्रवाही रस्त्यावर किंवा गर्दीच्या ठिकाणीही अ‍ॅपचा वापर
3. गर्दी-गोंगाटातही अ‍ॅपचा वापर होत असल्यास लक्ष विचलित

...हे करा

1. गर्दीवेळी अ‍ॅपचा वापर टाळावा 
2. प्रवास सुरू असताना शक्यतो साऊंडचे निर्देश पाळावेत 
3. रस्ता चुकत असल्यास गाडी बाजूला थांबवून अ‍ॅपचा आधार घ्यावा
4. शहरातील रस्त्यांची माहिती असणार्‍या वाहनचालकाला कंपन्यांनी प्राधान्य द्यावे

खासगी प्रवासी वाहनांतून नागरिकांची वाहतूक करताना संबंधित चालकाने रस्त्यावरील इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी घेतली पाहिजे. नवखे वाहनचालक मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून रस्ता शोधताना लक्ष विचलित होऊ शकते. त्यामुळे इतर वाहनचालकांचा अंदाज घेऊन वाहन चालविण्यास प्राधान्य दिले पाहिजे. - संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

सिंहगड रस्त्यावरून जाताना टॅक्सीचालकाकडून मॅप डिटेक्टरच्या सहाय्याने रस्ता शोधताना नियंत्रण सुटल्याने अपघात घडला होता. त्यामुळे मला किरकोळ दुखापत झाली होती. अनेक वेळा चारचाकी वाहनचालक मॅपच्या आधारे रस्ता शोधताना लक्ष विचलित झाल्याने गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून येते.  - अश्‍विनी बडे, विद्यार्थिंनी