Sat, Mar 23, 2019 12:24होमपेज › Pune › तिकोना गडाची तटबंदी मोजतेय अखेरच्या घटका

तिकोना गडाची तटबंदी मोजतेय अखेरच्या घटका

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 11:49PMकामशेत : किशोर ढोरे 

काळाच्या ओघात ऊन, वारा, पाऊस झेलत इतिहासाचा वारसा जपत टिकून असणारे मावळातील गडकोट किल्ल्यांची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. किल्ल्यांचे बुरुज व तटबंदी ढासळत असताना पुरातत्त्व विभाग मात्र याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. किल्ल्यांचे ढासळणारे बुरुज व तटबंदी यामुळे किल्ल्यांवर येणार्‍या पर्यटकांच्या दृष्टीने असुरक्षित ठरत आहे.

मावळातील तिकोना किल्ल्यावर देखील काही बुरुज व तटबंदी ढासळण्यास सुरवात झाली आहे. तिकोना किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरील जंग्या, पाण्याच्या टाक्यांकडे जाणारा मार्ग व बुरुज अशी तटबंदी काळाच्या ओघात दुर्लक्षित झाल्याने तिची अस्तित्व आता राहिलेले नाही; परंतु उजव्या बाजूची बुरुज व तटबंदी अजून शाबूत आहे. यामुळे गडाच्या सौंदर्यात भर पडत आहे;  पण तिचा एक तीन ते पाच मीटर अंतराच्या तटबंदीचा खालचा भाग काही दिवसांपूर्वी ढासळला असून,  आता ती तटबंदी अगदी अधांतरी राहिली असून कोणत्याही क्षणी ढासळण्याची शक्यता आहे. या तटबंदीच्या खाली साधारणत: 70 फूट खोल किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. ही तटबंदी कोसळल्यास त्यातील मोठे दगड हे थेट बालेकिल्ल्याच्या मार्गावर येऊन पडतील. त्यामुळे बालेकिल्ल्याचा रस्ता बंद होईलच; तसेच अशावेळी त्या ठिकाणी हजर असलेल्या पर्यटकांच्या जिवास देखील धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

मावळातील तिकोना किल्ला वाचविण्यासाठी  गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था या मागील अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यांच्या माध्यमातून किल्ल्यावर अनेक गड संवर्धनाची कामे सुरु आहेत. या ढासळलेल्या तटबंदीच्या कामासाठी देखील या संस्था पुढे येऊ पाहत आहेत; परंतु डागडुजीसाठी लागणार्‍या कायदेशीर परवानगी व आर्थिक अडचणी येत असल्याने ही तटबंदी वाचविण्यासाठी पुढे येऊ पाहणार्‍या संस्था अडखळत आहेत. यामुळे तिकोना किल्ल्यावरील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी पुरातत्त्व विभागाने किल्ल्यावरील धोकादायक झालेल्या तटबंदी व बुरुजांची पाहणी करून डागडुजी करून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अशा धोकादायक ठिकाणी  फलक लाऊन पर्यटकांना सावध करण्याची गरज आहे. 

पावसाळ्यात किल्ल्यांवर येणार्‍या पर्यटकांची संख्या जास्त असते; तसेच पावसामुळे जुनी बांधकामे ढासळण्याची शक्यता असते.  यामुळे पुरातत्व विभागाने पावसाळ्यात किल्ल्यांचे सर्वेक्षण करून किल्ल्यांवरील धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावणे;  तसेच सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे अतिशय गरजेचे आहे; तसेच धोकादायक ठिकाणी पर्यटकांना जाण्यास मज्जाव करणे गरजेचे आहे. तरच किल्ल्यावरील दुर्घटना टाळणे शक्य होईल.