Sun, Apr 21, 2019 06:08होमपेज › Pune › भुजलातील नायट्रेटने गाठली धोकादायक पातळी

भुजलातील नायट्रेटने गाठली धोकादायक पातळी

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 1:08AMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील साडेसहा हजारांहून अधिक गावांतील भूजलात नायट्रेटसह क्षार, फ्लोराईड आणि लोहाचे प्रमाण वाढले आहे. तसेच, भूजल स्त्रोतात नायट्रेटचे प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा अधिक असल्याचे राष्ट्रीय पेयजल विभागास निदर्शनास आले आहे. दरम्यान, नांदेड, नाशिक, औरंगाबाद, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातील गावांमधील भूजल स्त्रोत नायट्रेटने प्रदूषित असल्याचे विभागाच्या अहवालातून स्पष्ट दिसून येत आहे. 

राष्ट्रीय पेयजल विभागामार्फत राज्यातील विविध ठिकाणच्या 1 लाख 76 हजार 326 भूजल स्त्रोतांमधील 3 लाख 86 हजार 526 नमुने तपासण्यात आले. त्यांपैकी 8 हजार 878 जलस्त्रोतात फ्लोराईड, आयर्न, क्षार आणि नायट्रेटचे प्रमाण क्षमतेपेक्षा अधिक आढळून आले आहे. त्यातील 6 हजार 703 भूजल स्त्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण मानकापेक्षा अधिक आढळून आल्याचे विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

निसर्गत:च खडकांची रचना होताना त्यात नायट्रेटची निर्मिती झालेली असल्याचे सांगून डी. आर. वारे म्हणाले, अनेकदा खतांचा वापरातून देखील नायट्रेट भूजलात पाझरतो. पाण्यातील नायट्रेटची 45 मिलिग्रॅम प्रतिलिटर इतकी मात्रा सामान्य मानली जाते. नायट्रेटचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या नाशिक जिल्ह्यातील चिंचोडी बुद्रुक ग्रामपंचायतीमधील रायते गावात नायट्रेटची मात्रा 414 मिलिग्रॅम प्रतिलिटर इतकी प्रचंड आढळून आली आहे. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील करंदी येथे सर्वाधिक 138 इतकी मात्रा आढळून आली आहे. दरम्यान, गडचिरोलीतील जांभळी या गावातील पाण्याच्या नमुन्यामध्ये आर्सेनिक या अत्यंत घातक द्रव्याचा अंश सापडला आहे. त्याचे पाण्यातील प्रमाण 0.01 इतके असणे आवश्यक असते. मात्र, ते 12.12 मिलिग्रॅम प्रतिलिटर इतके होते. दरम्यान, तेथील जलस्त्रोतावर शास्त्रीय उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.  

नायट्रेट पाठोपाठ फ्लोराईडचे 721, आयर्न 723 आणि क्षारांचे 730 नमुने धोकादायक पातळीवर असल्याचे दिसून आले आहे. जळगावमधील 174, नागपूरमधील 146, नांदेडमधील 106 जलस्त्रोतांत फ्लोराईडचे आढळले. पाण्यात दीड मिलिग्रॅम प्रतिलिटर इतकी मात्रा सामान्य मानली जाते. राज्यात यवतमाळमध्ये सर्वाधिक 174 जलस्त्रोत फ्लोराईडने बाधित आहेत. येथील घाटंजी परिसरातील पिंपरी ग्रामपंचायतीमधील जलस्त्रोतात फ्लोराईडची 3.40 मिलिग्रॅम प्रतिलिटर इतकी मात्रा आढळून आली आहे.गोंदियामधील 178 जलस्त्रोतांच्या नमुन्यांमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यापाठोपाठ नाशिक, कोल्हापूर आणि भंडारा जिल्ह्याचा क्रमांक लागतो. सोलापूर जिल्ह्यातील 136 जलस्त्रोतात क्षारांचे प्रमाण अधिक आहे. प्रतिलिटर 2 हजार मिलिग्रॅम क्षाराचे प्रमाण सामान्य मानले जाते. सोलापूर येथील माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी ग्रामपंचायतीमधील जलस्त्रोतात 8 हजार 200 इतकी मात्रा आढळून आली आहेत. सोलापूरपाठोपाठ परभणी 73, अकोला येथील 59 जलस्त्रोत क्षारांच्या अधिक प्रमाणामुळे पाणी खारे झाले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Tags : Pune, Dangerous, levels, reached, nitrate, Bhuj