Fri, Jul 19, 2019 07:21होमपेज › Pune › पाठ्यपुस्तकात दैनंदिन विज्ञानानुभव

पाठ्यपुस्तकात दैनंदिन विज्ञानानुभव

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 1:32AMपुणे : प्रतिनिधी  

विज्ञानातील संकल्पनांचा अभ्यास करताना विद्यार्थी त्या स्वत: समजावून घेण्याचा प्रयत्न करतील. त्या संकल्पनांशी संबंधित विद्यार्थ्यांच्या रोजच्या जीवनातील घटनांचा अनुभवांचा इयत्ता दहावी विज्ञानाच्या नव्या पाठ्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना मिळण्यासाठी ‘जाणून घ्या’  ‘विचार करा’, ‘थोडे आठवा’ अशा सूचनांचा वापर करण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या इंटरनेटसंदर्भातील आवडीचा वापर करण्यात आला आहे. ‘इंटरनेट माझा मित्र’ या शीर्षकाखाली अनेक संकल्पनांविषयी विद्यार्थ्यांनाच इंटरनेटचा वापर करून माहिती मिळविण्यास या अभ्यासक्रमात प्रवृत्त करण्यात आले आहे, अशी माहिती विज्ञान विषय समितीचे विशेष अधिकारी राजीव पाटोळे यांनी दिली. 

आजपर्यंत केवळ नेत्रदानाविषयी माहिती असलेल्या विद्यार्थ्यांना अवयव दानाविषयी माहिती देण्यात आली आहे. शरीरातील कोणकोेणते अवयव दान करता येतील, त्यासाठी कोणते कायदे आहेत, असे ते म्हणाले.

देहदान, ऑर्गन ट्रान्सप्लांट, ताण, व्यसनाधिनता, अ‍ॅडीक्शन, विज्ञानाशी संबधित विविध उद्योग, आपत्ती व्यवस्थापन, हे दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान विद्यार्थ्यांना आता शिकता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी खर्‍या अर्थाने विज्ञान जगणारा अभ्यासक्रम शिकणार आहे. इयत्ता दहावीनंतर कुणी कला शाखेत प्रवेश घेतो, तर कुणी वाणिज्य किंवा विज्ञान शाखेकडे जातो. काही विद्यार्थी तर असे असतात, की त्यांना दहावीनंतर शिक्षण घेणे शक्य होत नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेऊन अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणामध्ये विज्ञानाचा अभ्यास करो वा ना करो, त्यांचा दहावीतच वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागेल. हे विद्यार्थी जीवनाकडे जास्तीत जास्त वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहू लागतील आणि त्यांची अंधश्रध्दा दूर होण्यास मदत होईल.

विज्ञान भाग 1 मध्ये अवकाश संशोधन, रसायशास्त्राची मांडणी वेगळ्या पध्दतीने करण्यात आली आहे. यात विद्यार्थ्यांच्या यशकथा देण्यात आल्या असून, सीईओपी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्वयम् उपग्रहाची माहितीही यात देण्यात आली आहे. शास्त्रज्ञांचा परिचय अनेक पाठात करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना विविध उपकरणे तसेच सर्किट निर्माण करण्यास सांगण्यात आले आहे. भारताची अंतराळातील संशोधनातील प्रगती दाखविण्यात आली आहे. पहिल्यांदाच अ‍ॅस्ट्रोफिजीक्स या शाखेचा समावेश करण्यात आला आहे. विज्ञान भाग 2 या पुस्तकात पर्यावरण जीवशास्त्र यावर आधारित माहिती देण्यात आली आहे. आरोग्यासंदर्भात विकसित झालेले नवविन तंत्रज्ञानही यात मांडणण्यात आले आहे. यातील आयव्हीएफ, सरोगसी, लोकसंख्या नियंत्रण यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, यासाठी जैवतंत्रज्ञान, टिश्यू कल्चर, रोपवाटिका, वेगवेगळे उद्योग, खतनिर्मिती, सेंद्रीय शेती, फळप्रक्रिया उद्योग, पर्यावरण संवर्धन संरक्षण, मायक्रोबॉयोलॉजी, क्‍लिन टेक्नोलॉजी, सीवेज मॅनेजमेंट, सामाजिक आरोग्य यांचाही नव्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तकांव्दारे विज्ञान शिकवावे या प्रचलित भूमिकेपेक्षा नव्या ज्ञानरचनावादानुसार विद्यार्थ्याने पाठ्यपुस्तक वाचावे, त्यातील कृती स्वत: कराव्यात, या कृतीच्या मांडणीतून आणि त्याच्या निरिक्षणातून विज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासामध्ये शिक्षकाने एका जाणत्या, समंजस, प्रगल्भ मार्गदर्शकाची भूमीका निभावावी, अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवण्यात आला असल्याचे पाटोळे यांनी सांगितले.

कल्पक प्रश्‍नांचा वापर

पुस्तकात पारंपरिक प्रश्‍नांच्या बरोबरीने नवीन कल्पक प्रश्‍नांचा वापर करण्यात आला आहे. या प्रश्‍नांव्दारे विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य, विचारशक्ती, कल्पनाशक्ती, प्रयोगशीलता उपक्रमशीलता, विविध विद्याशाखांचा आंतरसंबंध लावण्याची वृत्ती, या गुणांना वाव मिळणार आहे. विज्ञान म्हटले की, निरीक्षणशक्ती, योग्य विचारशक्ती, कुतूहल, या प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या या सर्व प्रवृत्ती प्रगल्भ करण्याचा प्रयत्न या नव्या अभ्यासक्रमात केला आहे.