Tue, Jul 23, 2019 16:57होमपेज › Pune › रोज १ हजार १६१ नवी वाहने 

रोज १ हजार १६१ नवी वाहने 

Published On: Dec 05 2017 1:45AM | Last Updated: Dec 04 2017 11:07PM

बुकमार्क करा

पुणे : नवनाथ शिंदे

स्मार्ट शहराकडे वाटचाल करणार्‍या शहरांत दरदिवशी तब्बल 1 हजार 161 वाहनांची नव्याने भर पडत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणाचा आलेख वाढत चालला आहे. शहरात दिवसाला 761 वाहनांची खरेदी केली जात आहे, तर पिंपरी-चिंचवडमध्ये दरदिवशी 400 वाहने खरेदी केली जात आहेत. त्यामुळे जानेवारी ते नोव्हेंबरच्या 11 महिन्यांच्या कालखंडात दोन्ही शहरांत 3 लाख 90 हजार वाहनांची भर पडली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांच्या खरेदीचा आलेख वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे नागरिकांकडून खासगी वाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे.  शहरात दरदिवशी 1 हजार 161 वाहनांची भर रस्त्यांवर पडत आहे. त्यामुळे वाहनांचे प्रमाण वाढल्याने महत्त्वाच्या रस्त्यावरून वाहतुकीसाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. 

आरटीओच्या नोंदीनुसार शहरात 11 महिन्यांत 2 लाख 52 हजार 883 वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक  प्रमाण दुचाकींचे असून, ही आकडेवारी तब्बल 1 लाख 81 हजार 661 एवढी आहे. तसेच चारचाकी वाहनांच्या खरेदीचा आकडा 50 हजार 289 आहे. तर तीनचाकी वाहनांची संख्या 5 हजार 827 आहे. प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक करणार्‍या वाहनांची संख्या 9 हजार 290 आहे. अवघ्या 339 दिवसांत शहरात अडीच लाखांवर वाहनांची खरेदी झाल्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या रांगा वाढल्याचे चित्र आढळून येत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणार्‍या नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. विविध कंपन्यामध्ये शिफ्टमध्ये काम करण्यासाठी जाण्यास विलंब लागत असल्याने खासगी वाहन खरेदीचा आकडा वाढला आहे. त्यामुळे दिवसाला तब्बल 400 नवीन वाहनांची खरेदी केली जात आहे. दरम्यान मागील 11 महिन्यांत 1 लाख 34 हजार 232 वाहनांची नोंद पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली आहे.  त्यामध्ये 97 हजार 226 दुचाकींचा समावेश आहे. तर चारचाकींची आकडेवारी 27 हजार 771 आहे. पुणे शहरात वाहनांची आकडेवारी 30 लाखांपेक्षा अधिक आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन संख्या 15 लाखांवर पोहचली आहे. मिळून तब्बल 49 लाखांवर वाहन संख्या शिखरावर पोहचली आहे. 

10 वर्षांत वाहनांची संख्या एक कोटीवर

दिवसाला 1 हजार 161 वाहनांची भर पडत आहे. महिनाभरात हा आकडा 34 हजार 830 वर पोहचला आहे. त्यामुळे पुढील 10 वर्षेे वाहन खरेदीचा वेग एवढाच राहिल्यास आकडेवारी 42 लाखांवर पोहचणार आहे. त्यामुळे 2017 पर्यंतची  49 लाख वाहने आणि 2027 पर्यंत नव्याने 42 लाख वाहनांची भर ही आकडेवारी एक कोटीवर पोहचणार आहे. त्यामुळे 40 ते 45 लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील वाहन खरेदी दुप्पट वाढणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.