Wed, Apr 24, 2019 21:31होमपेज › Pune › ‘दगडूशेठ’ सजावटीला वासापूजनाने श्रीगणेशा

‘दगडूशेठ’ सजावटीला वासापूजनाने श्रीगणेशा

Published On: Aug 03 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 12:26AMपुणे : प्रतिनिधी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 126व्या वर्षानिमित्त गणेशोत्सवात तामिळनाडू तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिर साकारण्यात येणार आहे. यंदाच्या सजावटीचे वासापूजन बुधवार पेठेतील सजावट स्थळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. जय गणेश आणि मंत्रपठणाच्या जयघोषात ट्रस्टचे विश्वस्त व कार्यकर्त्यांनी यंदाच्या सजावटीच्या तयारीचा श्रीगणेशा केला. 

या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, नगरसेवक राजेश येनपुरे, अजय खेडेकर, अंकुश काकडे, शिल्पकार विवेक खटावकर, राजाभाऊ घोडके, बाळासाहेब सातपुते, उल्हास भट, विकास काळे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अशोक गोडसे म्हणाले, सलग 75 वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरिता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. तब्बल 1200 ते 1600 वर्षांपूर्वी असलेल्या मंदिराच्या स्थापत्यकलेचा उत्कष्ट नमुना भाविकांसमोर आणण्याचा सजावटीच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे. यंदा श्री राजराजेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये मुख्य सभामंडप आणि गाभारा वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. गाभार्‍यात गणेशपुराणात संदर्भ असलेल्या कळंब, सिद्धटेक, थेऊर आणि रांजणगावच्या गणेशासंबंधी विविध प्रसंग साकारण्यात येत आहेत.

गोडसे म्हणाले, श्री राजराजेश्वर मंदिराला तमीळ भाषेमध्ये बृहदेश्वर मंदिर किंवा बृहदीश्वर मंदिर असे म्हटले जाते. चोल राजवटीतील राजे राजराज चोल यांनी या मंदिराची निर्मिती केली असल्याने राजराजेश्वर मंदिर या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर 13 मजली असून, 66 मीटर उंचीचे आहे. वास्तुकला, पाषाण आणि ताम्र शिल्पांकन, चित्रांकन, नृत्य, संगीत, आभूषण या कलांचे भांडार असा लौकिक असलेल्या या मंदिरामध्ये संस्कृत आणि तमीळ पुरालेखांचा अनोखा संगम आहे. या मंदिराची प्रतिकृती यंदा ट्रस्टतर्फे साकारण्यात येणार आहे.