Fri, Apr 26, 2019 03:41होमपेज › Pune › ‘दादांना मुख्यमंत्री करायचे आहे, तर बूथ कमिटी मजबूत करा’

‘दादांना मुख्यमंत्री करायचे आहे, तर बूथ कमिटी मजबूत करा’

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 12:46AMपिंपरी : केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारला जनता कंटाळली आहे. भाजपला सत्तेतून बाहेरचा मार्ग दाखविण्यासाठी युवक राष्ट्रवादीने काम केले पाहिजे. सध्याच्या सत्ताधार्‍यांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला असल्याचे जनतेस युवकच्या कार्यकर्त्यांनी उदाहरणासहित पटवून दिले पाहिजे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या माध्यमातून अजित पवार राज्यात जे काम करीत आहेत, त्याची माहिती बूथ कमिटीच्या माध्यमातून घरोघरी पोचविण्यासाठी बूथ कमिटी मजबूत करणे गरजेचे असून, त्यातूनच युवक राष्ट्रीवादीने अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा केलेला संकल्प निश्चित सिद्धीस जाईल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. 

भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात रविवारी (दि.22) पार पडलेल्या पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक बूथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी खा. रणजितसिंह मोहिते, माजी आ. विलास लांडे, बापूसाहेब पठारे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आ. रमेश थोरात, अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, ईश्वर बाळगुदे, पुणे जिल्हा ग्रामीण युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, पिंपरी-चिंचवड युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, आदींसह आजी-माजी नगरसेवक व युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. युथ राष्ट्रवादीने वादळ निर्माण केले पाहिजे. तरच अजित पवार मुख्यमंत्री होतील. अजितदादा रागीट आहेत असे बोलले जाते; परंतु दादा बाहेरून जेवढे कणखर दिसतात, त्यापेक्षा आतून ते दिलदार आहेत. वेळेला महत्व देणारा नेता वेळेला धावून येणार नेता, जे बोलेल ते करणारा नेता असा महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंतची माहिती असणारे दादा हे एकमेव नेतृत्व आहे.  बूथ कमिटीच्या माध्यमातून दहा जणांना एका बुथचे प्रमुख करा.

एक प्रमुखाकडे साठ घरांची जबाबदारी द्या. त्यांनी संबंधित घरी जाऊन पक्षाचे ध्येय-धोरण आणि सत्ताधारी जनतेला कसे फसवत आहेत, याबाबत माहिती द्या. आता नाही तर कधी नाही ही परस्थिती सध्या आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन माता-भगिनींना ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवत सध्याच्या महागाईविषयी विचारा. ही महागाई आपणास चालते का, असा प्रश्न उपस्थित करा. यातील अनेकांचे उत्तर नाही असे मिळेल. असा सध्याच्या सत्ताधार्‍यांवरील नाराज समाजघटक निश्चितपणे राष्ट्रवादीला मतदान करेल असा माझा विश्वास आहे. त्यामुळे जो संकल्प केला आहे तो पूर्ण करण्यासाठी सर्व युवकांनी प्रयत्न करावेत असा सल्ला यावेळी मुंडे यांनी दिला. यावेळी माजी खा. रणजित माीेहिते, माजी आ. विलास लांडे ,संग्राम कोते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पुणे जिल्हा ग्रामीण युवक अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी तर आभार पिंपरी-चिंचवड युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी मानले. 

सहाव्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

पिंपरी :  इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना हिंजवडी येथे रविवारी (दि.22) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.प्रभाकर भगवानराव हंबर्डे (25, रा. मोशी) असे इमारतीवरून पडून मृत्यू  झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाकर हिंजवडीतील एका खासगी कंपनीत कामास आहे. रविवार सुट्टी असल्याने तो हिंजवडीतील एक्सर्बिया सोसायटी येथे मित्राकडे आला होता. रात्री एकच्या सुमारास तो बाथरूमच्या खिडकीतून खाली पडल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी अकस्मात मयत अशी नोंद केली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.  

थेरगावमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला

पिंपरी :  केजुदेवी बंधार्‍यात एका पस्तीस वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. हा प्रकार रविवार्री (दि.22) सकाळी दहाच्या सुमारास थेरगाव येथे उघडकीस आला. वाकडचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजण (गुन्हे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी दहाच्या सुमारास केजुदेवी बंधार्‍याजवळ मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती मिळाली. वाकड पोलीस आणि अग्निशमनदलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला दोरीच्या साहायाने मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.मात्र, मृतदेह पाण्याच्या प्रवाहासोबत पुढे सरकत असल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना त्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले. पाण्याच्या प्रवाहामुळे मृतदेह पाण्याखाली जाऊन बराच वेळ दिसेनासा झाल्याने शोधकार्यात बराच वेळ गेला.

काही वेळानंतर मृतदेह भोवर्‍यात अडकल्याचे लक्षात आले. भोवर्‍यात अडकल्याने मृतदेह बुडाल्याच्या ठिकाणाहून बर्‍याच वेळानंतर दुसर्‍या ठिकाणी बाहेर येत होता. तब्बल सहा तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांना मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश मिळाले. महिला दोन दिवसांपूर्वी पाण्यात पडल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. महिलेच्या मानेवर ’रोहन’ असे गोंदण आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. महिलेची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.  

बेपत्ता वृद्धाचा मृतदेह किन्हईत आढळला

इंदोरी : इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील पुलावरुन जाणार्‍या वृद्धास पाठीमागून येणार्‍या गाडीची धडक बसून नदीपात्रात पडले होते व  बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह किन्हई येथे इंद्रायणी नदीपात्रात रविवारी (दि. 22) सापडला. ज्ञानेश्वर मोहन चव्हाण (68 रा. इंदोरी) असे नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गेल्या रविवारी (दि. 15) चव्हाण हे इंदोरी येथील इंद्रायणी नदीपुलावरून जाताना त्यांना पाठीमागून येणार्‍या पिकअप गाडीने धडक दिली. त्यामुळे ते  नदीपात्रात पडले व पाण्याच्या प्रवाहात वाहून बेपत्ता झाले होते. ‘एनडीआरएफ’च्या पथकाने त्यांचा शोध घेतला होता; परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे अडथळे आल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते. आठवडाभरानंतर चव्हाण यांचा मृतदेह देहरोड येथील किन्हई गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीपात्रात सापडला. 

भूमकर चौकात अज्ञातांनी बस फोडली

पिंपरी : मोटारीतून आलेल्या चौघांनी प्रवासी घेऊन जाणार्‍या एसटी बसवर दगडफेक केली. ही घटना रविवारी (दि.22) मध्यरात्री वाकड येथील भूमकर चौकात घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम यांनी फिर्याद दिली असून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रविवारी पहाटे परळी डेपोची एसटी (एमएच 20 बीएल 3881) पनवेल वरून शिरूरच्या दिशेने जात होती. दरम्यान एसटी भूमकर चौकात आली असता मोटारीतून आलेल्या चौघांनी एसटी अडवली. एसटीच्या समोरच्या काचेवर दगड मारून नुकसान केले. सुदैवाने यामध्ये एकही प्रवासी जखमी झाला नाही. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.