Wed, Jul 24, 2019 05:41होमपेज › Pune › दरोडेखारोंच्या १२ तासात मुसक्या आवळल्या

दरोडेखारोंच्या १२ तासात मुसक्या आवळल्या

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 23 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी 

भरदिवसा रविवार पेठेतील पायल गोल्ड या सराफी दुकानात धाडसी दरोडा टाकून 800 ग्रॅम सोने व इतर वस्तू घेऊन नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना गुन्हे शाखेच्या पथकाने बारा तासांच्या आत वापी येथून  तर एकाला पुण्यातून अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 650 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहे.  दोन आठवड्यांपूर्वी रविवार पेठेत अशाच प्रकारे सराफी कारागीराला लुबाडल्याचा गुन्हा त्यांच्याकडून  उघडकीस आणला आहे, अशी माहिती अप्पर पोलिस आयुक्त प्रदिप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मनिष गोविंद स्वार (25, संत कबीर चौक, नाना पेठ), देवेंद्र बहाद्दूर कुंवर (27, कोंढवा ) प्रकाश करण खडका (27, नाना पेठ), मनोज मंगल बगोटी (21, ताडदेव, मुंबई सेंट्रल), गोकुळ सागर आड (20, गंजपेठ सर्व रा. मुळ नेपाळ), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर त्यांची या गुन्ह्यात साथ देणारा भरत बिका हा पसार झाला आहे. तसेच याआधीच्या गुन्ह्यातील साथीदार गोकुळ खडका हादेखील पसार झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पुण्यातील रहदारीच्या मध्यवस्तीतील पायल गोल्ड या सराफी दुकानातील कर्मचार्‍याला  पाच लोकांनी कोयत्याचा धाक दाखवून 800 ग्रॅम वजनाचे सोने व मोबाईल लुबाडला होता. त्यानंतर याबाबत फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा केला.  गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त समीर शेख  यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट 1, युनिट 2, दरोडा प्रतिबंधक पथक, खंडणीविरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची चार पथके तपासाससाठी नियुक्त करण्यात आली होती.

या चारही पथकांना वेगवेगळी कामे वाटून दिली होती. त्यानंतर या प्रकरणाचे सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले आणि तेथील व्यापार्‍यांनाही पाठविण्यात आले होते. दरोडा प्रतिबंधक पथकाचे कर्मचारी पोलिस नाईक रामदास गणोते यांनी सीसीटिव्ही फुटेजवरून मनीष स्वार याला ओळखले होते. त्यानुसार त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी त्याच्या पत्नीने दीराला घेऊन साडेपाच वाजताच घर सोडले होते, अशी माहिती मिळाली. तसेच ती मुंबईला पुणे स्टेशन येथून मुंबईला एका इर्टीगा कारमधून जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या कारचा क्रमांक मिळवून त्या मुंबईच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी दोघांना सानपाडा येथे पकडले.

त्यानंतर महिलेकडे तपास केल्यावर पाचजण डेहराडून एक्सप्रेसने नेपाळला जात असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी रेल्वे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी वेगवेगळ्या स्टेशनवर अतिरिक्त कुमक तैनात करून रेल्वेची झडती घेतल्यावर चारजणांना त्यांनी ताब्यात घेतले. तर भरत बिका हा पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडे तपास केल्यावर गोकुळ सागर आड  यालाही अटक केली. त्यांच्याकडून एकूण 20 लाख रुपये किंमतीचे 650 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले. 

ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले पाटील, सतिश निकम, राजेंद्र कदम, उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, सहायक निरीक्षक संजय दळवी, कर्मचारी रामदास गणोते, रिजवान जिनेडी, मोहन येलपल्ले, सागर तोरडमल, दिनेस गडांकुश, परवेझ जमादार, व इतर पोलिस कर्मचारी यांच्या पथकाने केली.  

कोंढव्यात केले मुद्देमालाचे वाटे 

रविवार पेठेत दरोडा टाकल्यानंतर सर्वजण कोंढवा येथे असलेल्या एका चायनीजच्या दुकानात काम करणार्‍या त्यांचा नेपाळी मित्र हंसराज लाले कामी याच्याकडे त्यांनी लुटीच्या सोन्याचे वाटे करून तेथून मुंबईला गेले. त्यानंतर डेहराडून एक्सप्रेसच्या बोगीमध्ये ते सर्वजण बसले होते. रेल्वे पोलिसांनी त्यातील मनीष स्वार याची झडती घेतली. त्यात इतर तिघे सापडले. तर भरत बिका हा संधीचा फायदा घेऊन मध्येच एका स्टेशनवरून पसार झाला.