Sun, May 26, 2019 10:37होमपेज › Pune › दाभोलकर हत्येत सीबीआय करणार चौघांना अटक

दाभोलकर हत्येत सीबीआय करणार चौघांना अटक

Published On: Aug 28 2018 1:44AM | Last Updated: Aug 28 2018 12:39AMपुणे : प्रतिनिधी

बंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने 7.65 एमएमचे देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे सचिन अंदुरेला दिली होती. अनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर हल्ला करण्यासाठी 7.65 एमएम या पिस्तुलालचाच वापर झाला होता. या दोन्ही हत्यांसाठी एकाच पिस्तुलाचा वापर झाला काय, या दृष्टीने तपास सुरू असताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आता लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील तिघा आरोपींसह चौघांना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात अटक करणार असल्याची माहिती सीबीआय सूत्रांनी दिली. याबाबत न्यायालयाने चौघांविरोधात प्रॉडक्शन वारंट जारी केले आहे.   

गौरी लंकेश हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेला अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांच्यासह नालासोपारा स्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेला व डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा दुसरा शूटर शरद कळसकर अशा चौघांना सीबीआय अटक करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयाने याप्रकरणी प्रॉडक्शन वारंटसाठी परवागनी सीबीआयला दिली आहे. शरद कळसकरचे यापूर्वीच प्रॉडक्शन वॉरंट निघाले असून सोमवारी काळे, बंगेरा आणि दिगवेकर यांच्या प्रॉडक्शन वारंटला परवानगी दिली आहे. 

अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा  या तिघांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने रेकी केल्याची बाब केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाल्याने व गौरी लंकेश हत्या आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या कनेक्शन उघड होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, गौरी लंकेश हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या  एका आरोपीने 7.65 एमएमचे कन्ट्रीमेड पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे सचिन अंदुरेला दिली होती. 11 ऑगस्ट 2018 रोजी अंदुरेनेही हे पिस्तूल आणि काडतुसे त्याचा मेव्हुणा शुभम सुरळेला औरंगाबाद येथे दिली. दरम्यान, सीबीआयने सुरळेच्या घरी तपास केल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या तपासमध्ये ही पिस्तूल आणि 3 काडतुसे त्याने त्याचा मित्र रोहित राजेश रेगे याच्याकडे ठेवण्यासाठी दिली होती. ती पिस्तुले सीबीआयने रोहित रेगेच्या विघ्नहर्ता बिल्डींग, धावणी मोहल्ला, औरंगाबाद येथून जप्त केली आहेत. ही पिस्तूल सचिन अंदुरेला देणारा लंकेश प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एका आरोपीने दिले असण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्ती केली आहे. 

सीबीआयने अंदुरेसोबत दुसरा गोळी झाडणारा हा शरद कळसकर असल्याचे न्यायालयासमोर आले आहे. कळसकर हा सध्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) कोठडीत असून त्याला मुुंंबई येथील न्यायालयाने त्याला 28 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर लगेचच डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी सीबीआयकडून अटक करण्यात येणार आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्याकडे एकाच वेळी तपास करायचा आहे. तसेच गौरी लंकेश हत्याप्रकरणातील ज्या आरोपींचा डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात सहभाग आहे, त्यांच्याकडेही सीबीआयला तपास करायचा असल्याने याप्रकरणी या चौघांविरूद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी याप्रकरणी नुकतेच प्रॉडक्शन वारंट बजावले आहे. चौघांना अटक झाल्यानंतर त्यांच्याकडील तपासामध्ये मोठे धागे-धोरे उघड होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.