Thu, Jun 27, 2019 17:44होमपेज › Pune › अस्वस्थ वाटल्यामुळे डीएसके रुग्णालयात

अस्वस्थ वाटल्यामुळे डीएसके रुग्णालयात

Published On: Feb 19 2018 1:37AM | Last Updated: Feb 19 2018 1:17AMपुणे : प्रतिनिधी

ठेवीदारांचे पैसे परत न केल्याच्या गुन्ह्यात पोलिस कोठडी सुनावण्यात आलेले डी. एस. कुलकर्णी यांना कोठडीत नेल्यानंतर काही वेळातचचक्कर आल्याने, मध्यरात्री ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, दुसर्‍या दिवशी त्यांना सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल न करता, खासगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी डीएसके यांचे वकिल चिन्मय इनामदार आणि अप्रमेय शिवदे यांनी न्यायालयाकडे केली. त्यानुसार, न्यायालयाने उपचाराकामी डीएसकेंना खासगी रुग्णालयात जाण्याची मुभा दिली. 

डीएसके यांच्यावर सायंकाळपयर्र्ंत ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. डीएसके यांनी पोलिसांनी दिलेले सरकारी जेवण नाकरल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

दरम्यान, शनिवारी रात्रीपासून डीएसके रुग्णालयातच उपचार घेत असून, गुन्ह्यात महत्त्वाचा तपास बाकी असल्याने आणि त्यांची पोलिस कोठडी वाया जाऊ नये, यासाठी रविवारी पोलिसांनी सुटीच्या न्यायालयात पुन्हा अर्ज केला व पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार, न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करून, डीएसकेंची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. ससून रुग्णालयात त्यांच्या सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून, त्याचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्क्त पकंज डहाणे यांनी दिली.

दीपक सखाराम कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ऑक्टोेंबर 2017 मध्ये महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये व भादंवि कलम 420 नुसार गुन्हादाखल करण्यात आला आहे. डीएसके दाम्पत्याचा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे डीएसकेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली व तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळवला; मात्र, काही रक्कम त्यांना भरण्याचे आदेश दिले. तसेच, पाच दिवस आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. यानंतर डीएसकें नी बुलडाणा अर्बन बँकेकडून दिल्या जाणार्‍या कर्जाचा हवाला देऊन न्यायालयाकडून 13 फेब्रुवारीची मुदत घेतली.

न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज 22 फेब्रुवारीपर्यंत आदेशासाठी राखून ठेवला होता. मात्र, डीएसकेंनी बुलडाणा बँकेला दिलेल्या मालमत्ता आधीच एका बँकेकडे तारण म्हणून ठेवल्या असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्या. साधना जाधव यांनी डीएसकेंचे अटकेपासूनचे संरक्षण काढून घेतले. तसेच, पोलिस त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करू शकतात, असेही स्पष्ट केले. त्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखेची चार पथके डीएसके यांचा शोध घेत होती. पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे दिल्लीतून डीएसके दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले. शनिवारी सहाच्या सुमारास त्यांना पुण्यात आणण्यात आले. साडेसहाच्या सुमारास डीएसकेंना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने डीएसके यांना रात्री दहाच्या सुमारास विश्रामबाग पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवले. नियमानुसार पोलिसांनी इतर आरोपींप्रमाणेच डी. एस. कुलकर्णी व पत्नी हेमंती कुलकर्णी यांना सरकारी जेवण दिले. मात्र, डी. एस. कुलकर्णी यांनी हे जेवण नाकारले. त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास अचानक डी. एस. कुलकर्णी चक्कर आल्याने पोलिस कोठडीत खाली बसले. येथील कर्तव्यावर असणार्‍या कर्मचारी व अधिकार्‍यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांना तत्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक झालेल्या या प्रकरामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. दरम्यान डीएसके यांच्यावर ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात सायंकाळपयर्र्ंत उपचार सुरू होते. डीएसके व्हेेंटिलेटरवरही काही वेळ असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून, त्याचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. 

दरम्यानच्या कालावधीत डीएसके यांची पोलिस कोठडी वाया जाऊ नये, यामुळे रविवारी पोलिसांनी न्यायालयाकडे अर्ज केला. त्यांचे पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार, न्यायालयाने पोलिसांनी केलेली मागणी मान्य करून डीएसकेंची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. दरम्यान डीएसके यांना एकदिवस उपचाराकामी दाखल करून मंगळवारी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळासमोर हजर केले जाणार आहे. त्या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी होईल. त्यानुसार, ससून आणि खासगी रुग्णालयाचे अहवाल न्यायालयास सादर होतील. त्यानंतर न्यायालय पुढील आदेश देईल.