होमपेज › Pune › डीएसके दाम्पत्याला १ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

डीएसके दाम्पत्याला १ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 12:25AMपुणे : प्रतिनिधी 

बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) (वय 68) यांची तब्बेत ठणठणीत असल्याचा अहवाल ससून वैद्यकीय बोर्डाने दिल्यानंतर, त्यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती (वय 59, दोघेही, रा. सेनापती बापट रस्ता) यांना 1 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी  दिला आहे. 

न्यायालयाने 17 फेब्रुवारी रोजी डीएसके दाम्पत्याला पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान 18 डिसेंबर रोजी पहाटे डीएसकेंची प्रकृती बिघडली होती. त्या वेळी पोलिस कोठडी अबाधित ठेवून न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. उपचारासाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी शुक्रवारी (दि. 23 फेब्रुवारी) रोजी ससून रुग्णालयात त्यांना हजर करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी सकाळी त्यांना ससून रुग्णालयात हजर करण्यात आले होते. त्या वेळी त्यांची तब्बेत चांगली असल्याचा अहवाल ससून रुग्णालय मेडिकल बोर्डाने दिला. त्यानुसार त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. तर पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी हेमंती यांना न्यायालयात हजर केले. त्या वेळी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी डीएसके दाम्पत्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.  

कागदपत्रांचा तपास करण्यासाठी, ठेवीदारांचे रजिस्टर मिळत नाही, त्यामुळे ठेवीदारांची नक्की संख्या कळत नाही. डीएसकेंच्या कंपन्यांनी थेट मालकांकडून जमिनी खरेदी केलेल्या नाहीत. त्या नातेवाईकांच्या मध्यस्थीने खरेदी केल्या आहेत. यामध्ये कोणकोण आहेत, पोलिस कोठडीमध्ये हेमंती पोलिसांना जुजबी उत्तरे देत आहेत, त्यामुळे त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची आणि डीएसकेंना पोलिस कोठडी देण्याची मागणी अ‍ॅड. चव्हाण यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने डीएसके दम्पत्याला पोलिस कोठडी सुनावली. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. श्रीकांत शिवदे यांनी काम पाहिले.

परिस्थिती उद्भवल्यास डीएसकेंवर उपचार मंगेशकर रुग्णालयात 

डीएसकेंना ससून रुग्णालयात देण्यात येणारे उपचार हे अगदी निम्न दर्जाचे असून, त्यांना पुन्हा ससून रुग्णालयात न हलविता खासगी रुग्णालयात हलविण्याची मागणी बचाव पक्षाचे वकील श्रीकांत शिवदे यांनी केली. त्यावर सरकारी पक्षाचे वकील चव्हाण यांनी सांगितले, एखाद्या मुलाला शाळेत जायचे नसेल, तर तो आईला पोटात दुखत असल्याचे कारण सांगतो. त्यानंतर आई जेव्हा दवाखान्यात नेण्याबाबत बोलल्यावर मुलाच्या पोटात दुखण्याचे लगेच थांबते, असे उदाहरण देताना डीएसकेंची अवस्था नेमकी तशी झाल्याचे नमूद केले. न्यायालयाने उपचाराच्या मुद्यावर भविष्यात उपचारासाठी डीएसकेंना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची मागणी मान्य केली. तत्पूर्वी ससून मेडिकल बोर्डाने डीएसकेंची तब्बेत नॉर्मल असल्याचा अहवाल दिला.