Wed, Mar 27, 2019 03:56होमपेज › Pune › DSKना पत्नीसह दिल्लीत अटक; पुणे पोलिसांची कारवाई

DSKना पत्नीसह दिल्लीत अटक

Published On: Feb 17 2018 8:11AM | Last Updated: Feb 17 2018 1:13PMपुणे : प्रतिनिधी 

ठेवीदारांना पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना पत्नीसह दिल्लीतील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी आज (शनिवार) पहाटे ही कारवाई केली. पैसे परत करण्याच्यासाठी दिलेली वेळ न पाळल्याने उच्च न्यायालयाने डीएसकेंना अटकेपासून दिलेले संरक्षण  काढून घेण्यात आले होते. न्यायमूर्ती साधना जाधव यांनी अटकपूर्व जामिनावर अंतिम सुनावणी १ मार्चपर्यंत तहकूब केली होती. न्यायालयाच्या या निर्णयानंतर कुलकर्णी दाम्पत्यांना  अटक करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फोन ट्रेस करुन पुणे पोलिसांनी डीएसकेंना दिल्लीतील हॉटेलातून अटक केली.  त्यांना पुण्यात आणण्याचे प्रयत्न सुरु असून आजच त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे समजते. 

पुणे पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चार पथके स्थापन करून ही पथके डीएसकेंना अटक करण्यासाठी रवाना झाली होती. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील या आशेने न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज 22 फेब्रुवारीपर्यंत आदेशासाठी राखून ठेवला होता.  मात्र, डीएसकेंनी बुलडाणा बँकेला ज्या दिलेल्या मालमत्ता, आधीच एका बँकेकडे तारण म्हणून ठेवलेल्या असल्याचे सरकारी वकिलांनी शुक्रवारी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्या. साधना जाधव यांनी डीएसकेंचे अटकेपासूनचे संरक्षण काढून घेतले. पोलिस त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करू शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. तसेच त्यांचे पासपोर्ट जप्त करण्याचे आदेशही यावेळी  संबंधित यंत्रणांना देण्यात आले होते. 

डीएसके यांच्याविरोधात आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे 4099 तक्रार अर्ज आले आहेत. या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 285 कोटी 21 लाख 16 हजार 580 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तर पुणे पोलिसांकडे डीएसके यांनी कर्ज म्हणून वैयक्तिक घेतलेल्या रकमांसदर्भातही तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींप्रमाणे एकूण 39 कोटी 41 लाख 93 हजार 389 रुपयांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यांची एकूण 276 बँक खाती गोठवली आहेत; तर त्यांच्या तीनशेहून अधिक  मालमत्तांचा अहवाल लिलावासाठी जिल्ह्याधिकार्‍यांकडे पाठविला आहे.