Mon, Jul 15, 2019 23:37होमपेज › Pune › चाकणपर्यंत मेट्रोचा ‘डीपीआर’ला ‘स्थायी’चा हिरवा कंदील

चाकणपर्यंत मेट्रोचा ‘डीपीआर’ला ‘स्थायी’चा हिरवा कंदील

Published On: Apr 19 2018 1:36AM | Last Updated: Apr 19 2018 12:36AMपिंपरी ः प्रतिनिधी

दुसर्‍या टप्प्यात कासारवाडीतील नाशिक फाटा चौक ते चाकणपर्यंत आणि पिंपरी ते निगडीपर्यंत  पुणे मेट्रोच्या ‘डीपीआर’ तयार करण्यास 4 कोटी 30 लाख 88 हजार 640 रूपयांचा  खर्चास स्थायी समितीने ‘हिरवा कंदील’ दिला आहे. तसेच, विविध विकासकामांच्या एकूण 39 कोटी 44 लाखांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.  

बुधवारी (दि.18) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्षा ममता गायकवाड होत्या. पुणे मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्यात नाशिक फाटा ते चाकणपर्यंत असे सुमारे 21 किलोमीटर आणि मोरवाडी, पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापर्यंत 7.5 किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गिकेचा ‘डीपीआर’साठी खर्च पालिका करणार आहे. त्यास समितीने मान्यता दिली. त्यामुळे मेट्रो थेट चाकण व निगडीपर्यंत धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

पीएमपीएलला संचलन तूट म्हणून द्यावयाची 7 कोटी 50 लाख रूपयांचा निधी देण्याचा विषय तहकूब करण्यात आला. अग्निशामक दलासाठी कर्मचारी नियुक्तीचा विषयही तहकूब करण्यात आला. पंतप्रधान आवास योजनेतील इमारतीसाठी बांधकाम परवानगीसाठी पर्यावरण दाखला व इतर आवश्यक दाखल्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी मान्यता देण्यात आली.