Sat, Apr 20, 2019 10:01होमपेज › Pune › उघडी रोहित्रे बनली ‘डेंजर झोन’ 

उघडी रोहित्रे बनली ‘डेंजर झोन’ 

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 12 2018 11:11PMपिंपरी : प्रदीप लोखंडे

पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक ठिकाणची  रोहित्रे (डीपी बॉक्स) उघड्या अवस्थेत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रोहित्रांची झाकणेच गायब झाल्यामुळे संबंधित परिसर ‘डेंजर झोन’ बनला आहे. शहरात नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. याप्रकरणी वीज कंपनी व संबंधित ठेकेदारांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

चिंचवडमध्ये रोहित्राचा स्फोट होऊन एकाला जीव गमवावा लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर महावितरण कार्यालयाकडून दखल घेतली जाईल अशी आशा शहरातील नागरिकांना होती; मात्र याबाबत महावितरणचे अधिकारी व ठेकेदार एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहेत. ठेकेदार अनेक कारणे पुढे करून वेळ मारून नेत आहेत. रोहित्राजवळील रहिवाशांना मात्र, भीतीच्या सावटाखाली वावरावे लागत आहे. रोहित्रांना दरवाजा लावणे, देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी महावितरणवर आहे. ठेकेदारांकडून याबाबतची कामे करून घेतली जात आहेत. ठेकेदाराचीही याबाबत अनास्थाच असल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत, पिंपरी बाजारपेठ, रिव्हररोड, पिंपरी, विजयनगर, पिंपळे गुरव, खराळवाडी, प्रेम लोक पार्क, खंडेवस्ती, आकुर्डी आदी ठिकाणी उघड्या रोहित्रांच्या समस्या आहेत. या परिसरात महाविद्यालये, रुग्णालय आदींसह नागरिकांची वर्दळ असणारी ठिकाणे आहेत. रोहित्राजवळून नागरिकांना ये-जा करावी लागत आहेत. पावसाळा सुरू असताना उघड्या रोहित्राजवळून जाणे धोक्याचे ठरत आहे. याबाबत महावितरणच्या संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.