होमपेज › Pune › डेमूचा नवाकोरा रेक धूळखात पडून

डेमूचा नवाकोरा रेक धूळखात पडून

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 1:03AMपुणे : प्रतिनिधी 

डिझेल मल्टिपल युनिटचा (डेमू) एक नवाकोरा रेक पंधरा दिवसांपासून वापराविना धूळखात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दौंड स्थानकात हा प्रकार निदर्शनास आला आहे.
पुणे-दौंड मार्गावर 25 मार्च 2017 ला डेमू सुरू झाली. सद्यःस्थितीत या मार्गावर डेमूचे पंधरा डब्यांचे दोन रेक धावत असून पुणे-दौंड-पुणे दरम्यान दररोज चार फेर्‍या होतात. मार्त्रें प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता हे रेक अपुरे पडत असल्याचे पाहणीतून दिसून येते. 

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात चेन्नईतून मेधा कंपनीचा दहा डब्यांचा एक रेक दाखल झाला. परंतु, तो वापराविना पडून आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता हा रेक पडून राहण्याऐवजी तो पुणे-दौंड मार्गावर सोडण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. ‘डेमूच्या फेर्‍या वाढवून दर तासाला तिला सोडण्यात यावे. दौंड-पुणे अशी डेमू सोडण्यापेक्षा पाटस-पुणे-पाटस, यवत-पुणे-यवत अशी नवी डेमू सुरू करावी, जेणेकरून लहान स्थानकातील प्रवाशांना त्याचा फायदा होईल’, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली आहे. 

रेक आला, फेर्‍या वाढणार?

दौंड- पुणेदरम्यान पहाटे 5.40 वाजता डेमू सुरू होण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. दौंड स्थानकात येत्या काही दिवसांत आणखी दोन रेक दाखल होणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे. डेमूचे रेक वाढल्यानंतर फेर्‍या वाढणार का हा औत्सुक्याचा विषय बनला आहे. सव्वा वर्षात डेमूच्या वेळापत्रकात बदल झाला नसून सर्व डेमू जुन्या वेळापत्रकाप्रमाणेच धावत आहेत. नवे रेक दाखल न झाल्याने फेर्‍या वाढवू शकलो नाही, असे उत्तर रेल्वेच्या एका अधिकार्‍याने दै. ‘पुढारी’शी बोलताना दिले आहे.