Mon, Jun 24, 2019 20:59होमपेज › Pune › डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची घोषणा

डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची घोषणा

Published On: Apr 26 2018 2:03AM | Last Updated: Apr 26 2018 1:17AMपुणे : प्रतिनिधी 

राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने  डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेला आता आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची मान्यता दिली असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून आकुर्डी येथे हे खासगी विद्यापीठ कार्यान्वित होणार असल्याची माहिती डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. विद्यापीठाचे नवनियुक्‍त कुलगुरू डॉ. प्रभात रंजन या वेळी उपस्थित होते. दरम्यान, पुण्यात आणखी एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिकण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.  

या शैक्षणिक वर्षापासून सहा विद्याशाखांतर्गत 32 नवीन अभ्यासक्रम सुरू होत आहेत. या सर्व अभ्यासक्रमांची निवड करताना प्रत्येक अभ्यासक्रमाची सद्य:स्थितीतील उद्योगांसाठीची उपयुक्‍तता, आवडीनुसार अभ्यासक्रम निवडण्याची सुविधा, कौशल्य विकासावर आधारित छोट्या मुदतीचे अभ्यासक्रम, विद्यापीठात उद्योगांना संशोधन केंद्र उभारण्यासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता, जगभरातील संशोधन क्षेत्रांचा होणारा विकास, आंतर व अंतर्गत विद्या शाखेतील परस्पर सहकार्याच्या संधी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक तथा संशोधनाचा कल इत्यादी बाबींचा विशेष विचार केला गेला, असे डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.

उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी व्यावसायिकांकडून कौशल्याचे परीक्षण होणार असून, प्रात्यक्षिकातून 50 टक्के शिक्षण, आघाडीच्या उद्योगांबरोबर सहकार्य करार, आंतरराष्ट्रीय सहकार्य करार, व्यावसायिक अभ्यासक्रम, परदेशी भाषांचे अभ्यासक्रम, स्किल इंडिया मिशन, सुसज्ज प्रशिक्षण प्रयोगशाळा, रोजगारांच्या संधी, आंतरविद्याशाखीय, कौशल्याधिष्ठित शिक्षण, प्रयोगशील अध्ययनावर भर आणि उद्योगांशी सहकार्य करारांमुळे रोजगारांच्या संधी ही अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये आहेत. जागतिकीकरणाच्या या युगामध्ये जागतिक पातळीच्या मानांकनानुसार गुणात्मक मनुष्यबळ ही काळाची गरज आहे. त्याला अनुसरून या विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय करार केले आहेत. सध्या जागतिक स्तरावरील नामांकित अशा सात परदेशी विद्यापीठांशी परस्पर सहकार्य करार झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने प्राध्यापक आदान-प्रदानद्वारे उच्च शैक्षणिक गुणवत्ता राखली जाणार आहे.  

या व्यतिरिक्‍त इतर सहा विद्यापीठांशी करारासंदर्भात सकारात्मक वाटचाल सुरू आहे. पुढील पाच वर्षांमध्ये या विद्यापीठाचा जगभरातील सुमारे 20 नामवंत विद्यापीठांशी अभ्यासक्रम, संशोधन, मनुष्यबळ इत्यादीसाठीचा सहकार्य करार अस्तित्वात येईल, अशी माहिती देण्यात आली.

या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणारे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम

बँकिंग व फायनान्स, ऑडिट व टॅक्सेशन, बिझनेस ऍनालिस्ट, लॉजिस्टिक व सप्लाय चेन मॅनेजमेंट, डिजिटल मीडिया, अ‍ॅडव्हर्टायझिंग व पब्लिक रिलेशन्स, ब्यूटी व वेलनेस, बायोटेक्नॉलॉॅजी, कम्युनिकेशन डिझाईन, ग्राफिक डिझाईन, युजर एक्सपिरिअन्स डिझाईन, आयटी इन्फ्राक्चर, सिस्टिम व सिक्युरिटी, क्लाऊड टेक्नॉलॉजी व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्रस.